काम महावितरणचे व ठेकेदाराचे परंतु राजकारण्यांची श्रेय घेण्यासाठी धडपड
चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरातील जवराबोडी, वाकरला, साठगाव, हिवरा, कोलारी, चिचाळा कुणबी, आजगाव या गावांमधील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा १० जून ला झालेल्या भयानक चक्रीवादळामुळे बंद होता. त्यामुळे या गावातील व शेतातील वीज पुरवठा हा जवळपास बंद होता. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने या गावातील शेतकऱ्यांचे पाण्याअभावी पिके सुकत असल्याने मोठे नुकसान होण्याची आशँका निर्माण झाली होती. परंतु हे काम नवीन आलेले इंजिनियर खोब्रागडे व महावितरण कंपनीचे ठेकेदार यांनी कामाचा वेग वाढवून आणि अतिरिक्त परिश्रम घेऊन दिनांक २८ जून ला सायंकाळपर्यंत पूर्ण केले व या गावातील शेतकऱ्यांचा शेतातील वीज पुरवठा सुरू केल्याने शेतकऱ्यांनी महावितरण चे इंजिनियर खोब्रागडे व ठेकेदार नितीन चुंचुवार यांचे आभार मानले आहे.
परंतु परिसरातील राजकारणी आपल्या राजकारणासाठी याचे श्रेय घेण्यासाठी धडपड करीत असल्याचे येथे दिसून येत आहे. प्रत्यक्षात पाहिले तर १० जूनला परिसरात मोठे चक्रीवादळ झाले. त्यानंतर ठिकठिकाणी महावितरण चे पोल व तारे तुटल्यामुळे आणि वीज तारांवरती मोठ मोठी झाडे पडल्यामुळे गावातील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी तारेवरती कसरत करावी लागली. अशातच अवघ्या तीन दिवसात महावितरण च्या शंकरपूर कार्यालयात रुजू असणारे तत्कालीन इंजिनियर अमोद रंधवे यांची तडका फडकी बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागेवर नवीन इंजिनीयर खोब्रागडे यांनी दोन दिवसानंतर शंकरपूर महावितरण कार्यालयाचा चार्ज घेतला त्यामुळे त्यांना परिसरातील माहिती घेण्यासाठी थोडा उशीर झाला. परंतु त्यांनी कोणताही उशीर न करता कामाला सुरुवात केली.
महावितरण ला इंजिनियर नवीन असल्याचे माहिती होताच परिसरातील शेतकरी कमलाकर ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाप्रमुख शुभम म्हणते यांनी इंजिनीयर खोब्रागडे यांची भेट घेऊन परिसरातील शेतकऱ्यांची पूर्ण वीज बंद असल्याचे आणि कोण कोणत्या गावांमध्ये किती पोलचे नुकसान झाले याबाबत सविस्तर माहिती देऊन तात्काळ वीज पुरवठा सुरू करावा याबाबतचे निवेदन दिले. दुसऱ्याच दिवशी स्वतः इंजिनियर खोब्रागडे यांनी चिमूर येथून स्वतः पोलची व्यवस्था करून विद्युत पोल शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ठेकेदारामार्फत टाकण्याची व्यवस्था केली आणि लगेच ठेकेदार यांनी कामाला सुरुवात केली. हे काम सुरू असताना अधून मधून येणाऱ्या पावसामुळे विलंब होत असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही प्रमाणात उशीर झाला त्यामुळे काही गावातील विद्युत पोल उभे करून तार कसल्या गेले तर काही गावातील विद्युत तारांची जोडणी करण्याचे काम काही प्रमाणात शिल्लक होते परंतु हे काम पूर्ण होत असतानाच तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरण कार्यालयाला घेराव घातल्या गेला त्यामुळे विद्युत वितरण कंपनीचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने इंजिनीयरने उद्या सायंकाळ पर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्याचे लेखी दिले. आणि दिनांक २८ जून रोजी सायंकाळी शेतकऱ्याच्या शेतातील व पूर्ण गावातील विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला
परंतु विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विद्युत मंडळाचे इंजिनियर खोब्रागडे व ठेकेदार यांनी अथक परिश्रम घेतले असून याचे श्रेय घेण्यासाठी परिसरातील राजकीय नेते धडपड करीत असल्याचे चित्र मात्र या ठिकाणी दिसून येत आहे.






