महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम…
चंद्रपूर
महाराष्ट्र माझा… मराठी माझी संवाद भाषा….! महाराष्ट्रातील सर्व ऑटो चालकांना आपल्या प्रवाशांशी मराठीतून व्यवहार, संभाषण करावे, या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासन परिवहन विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व मराठी ऑटो चालकांना मराठीतून ग्राहकांशी संवाद करता आला पाहिजे या उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्य, मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर येथील ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा प्रशिक्षण कार्यशाळेच्या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून मराठी विषय शिक्षक महासंघाच्या मुंबई जिल्हा प्रतिनिधी, आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सन्माननीय सदस्या प्राध्यापक दीपा ताई ठाणेकर व ज्येष्ठ साहित्यिक, अनुवादक मुंबई मराठी साहित्य संघाच्या सदस्या श्रीमती डॉ अनुराधाताई उजगरे मॅडम ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, संजय वैद्य चंद्रपूर, राज्य मार्गदर्शक डॉ विजय हेलवटे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रा. नामदेव मोरे, चंद्रपूर जिल्हा मार्गदर्शक प्राचार्य डॉ सुधीर मोते, परिवहन विभागाचे अधिकारी किरण मोरे साहेब, गडचिरोली व चंद्रपूर परिवहन अधिकारी लोडे साहेब यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्र भाषा, मराठी माझी संवाद भाषा अभियान कार्यशाळाप्रसंगी मराठी विषय शिक्षक महासंघाच्या मुंबई जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक दीपा ठाणेदार मॅडम मराठी भाषा तज्ज्ञ डॉक्टर अनुपमा उजगरे मॅडम यांनी ऑटो रिक्षा चालकांशी संवाद साधला. महाराष्ट्रात आपण आपला उदरनिर्वाह ऑटो रिक्षावर असल्याने आपण ग्राहकांशी मराठी भाषेतून संवाद साधावा याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी किरण मोरे साहेब यांनी ऑटो रिक्षा बांधवांना मार्गदर्शन केले. डॉ विजय हेलवटे सर यांनी तयार केलेल्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.
यावेळी महासंघाच्या वतीने प्रा. दीपाताई ठाणेकर तसेच डॉ . अनुपमा उजगरे मॅडम यांचा शाल श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अमराठी रिक्षा चालकांना मराठीचे प्रशिक्षण देण्याकरिता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत जवळपास दोनशे ऑटो चालक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूरच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.






