देश-विदेशातील संशोधक , प्राध्यापक उपस्थित….
गडचांदूर :
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर तालुका कोरपना जि. चंद्रपूर येथे दिनांक २६ व २७ ऑक्टोबर २०२६ रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, माणिकगढ सिमेंट, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने International Conference on Research Innovations in Science and Technology (ICRIST- 2026) या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे भव्य आणि यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिषदेला संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि विज्ञान क्षेत्रातील अभ्यासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिषदेसाठी ४०० हून अधिक संशोधकांनी नोंदणी केली होती, तर विज्ञान शाखेतील सुमारे ३०० संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी विविध विषयांवरील आपले संशोधन पेपर सादर केले.
परिषदेच्या पहिल्या दिवशी आयोजित उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून डॉ. अनिल चिताडे, प्राचार्य, राजीव गांधी अभियांत्रिकी व संशोधन संस्था चंद्रपूर तथा संचालक गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ उपस्थित होते. त्यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणातून विज्ञानाने केलेल्या प्रगती बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे सन्मानिय कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे तसेच सन्मानिय श्री सुभाष धोटे माजी आमदार व अध्यक्ष गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्यात. डॉ. वासुदेव गुरनुले यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून बीजभाषण (Keynote Address) दिले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर के शुक्ला हजर होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलते स्वरूप, संशोधनातील नवनवीन संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि समाजोपयोगी संशोधनाची आवश्यकता यावर सविस्तर विवेचन केले. संशोधकांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता नावीन्यपूर्ण प्रयोग, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. धनंजयजी गोरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संशोधन क्षेत्रातही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. अशा आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना आपले संशोधन सादर करण्याची, विविध संशोधकांशी विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि नवीन संशोधनाच्या दिशा समजून घेण्याची संधी मिळते, असे त्यांनी नमूद केले.
परिषदेचे समन्वयक डॉ. रामकृष्ण वाय. पटले यांनी परिषदेची संकल्पना, उद्दिष्टे आणि आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे, संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विविध विद्याशाखांतील संशोधनाची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचविणे तसेच संशोधन संस्कृती विकसित करणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी मुख्य आयोजक म्हणून परिषदेच्या संपूर्ण नियोजनाची व आयोजनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन त्यांनी महाविद्यालयाला 2026 चा गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली चा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स गडचांदूर या छोट्या गावात यशस्वी होत असल्याने गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, आपले सहकारी यांनी केलेल्या सहकार्या बद्दल धन्यवाद मानले.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. संदीप घोडिले यांनी प्रभावीपणे केले व आभार प्रदर्शन प्रा. चेतन वानखेडे यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर पहिल्या दिवशी एकूण पाच तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये विविध संशोधकांनी आपापल्या विषयांतील संशोधन निष्कर्ष, प्रयोग, नवीन संकल्पना आणि संशोधन पद्धती यांचे सादरीकरण केले. प्रत्येक सत्रामध्ये संशोधकांना आपल्या संशोधनाचे स्पष्टीकरण देण्याची तसेच उपस्थित तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व सूचना मिळविण्याची संधी मिळाली. तांत्रिक सत्रा मध्ये देश विदेशातील ख्यातनाम संशोधकांनी आपले विचार मांडलेत. यामध्ये सोनिया कार्बोनीयो न्यू युनिव्हर्सिटी ऑफ लिस्बन पोर्तुगाल, प्राध्यापक रामेश्वर अधिकारी त्रिभुवन युनिव्हर्सिटी काठमांडू नेपाळ, प्राध्यापक वासुदेव गुरनुले रा.तु.म.नागपूर विद्यापीठ, नागपूर, महाराष्ट्र, आर.के.शुक्ला, लखनऊ विद्यापीठ लखनऊ, उत्तर प्रदेश, प्राध्यापक ए.एच.हसमानी ,सरदार पटेल विद्यापीठ वल्लभ विद्यानगर, आणंद गुजरात, प्राध्यापक ज्योती आर्या ,जयपूर विद्यापीठ, जयपूर राजस्थान, प्राध्यापक व्ही.व्ही.गीते कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, जळगाव, महाराष्ट्र, आदि मान्यवर होते.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी उर्वरित तीन तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. अशा प्रकारे दोन दिवसांत एकूण आठ तांत्रिक सत्रे यशस्वीरीत्या पार पडली. या परिषदेमध्ये प्रामुख्याने रसायनशास्त्र (Chemistry), भौतिकशास्त्र (Physics), सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) आणि गणित (Mathematics) या विषयांशी संबंधित विविध संशोधनपर पेपर सादर करण्यात आले. विज्ञान शाखेतील सुमारे ३०० संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी संशोधन सादरीकरणात सहभाग घेतला. या सादरीकरणांमुळे विविध विषयांतील संशोधनाची माहिती, नवीन संशोधन पद्धती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानातील प्रगती यांची देवाणघेवाण झाली.
परिषदेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध विषयांमध्ये उल्लेखनीय संशोधन कार्य करणाऱ्या संशोधकांना Best Researcher Award प्रदान करून गौरविण्यात आले. रसायनशास्त्र चे डॉ. परवेझ अली, भौतिकशास्त्रचे डॉ. कार्तिक शिंदे, सूक्ष्मजीवशास्त्र चे डॉ. काटकर आणि गणिता ची विद्यार्थिनी कु धोटे यानां उत्कृष्ट संशोधन पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारांमुळे संशोधकांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच संशोधन क्षेत्रात अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.
दुसऱ्या दिवशी परिषदेचे समारोप सत्र उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. विठ्ठलरावजी थीपे उपाध्यक्ष ग. शि प्र. मंडळ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री .धनंजय गोरे सचिव गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर ,महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.शैलेंद्र देव, प्राध्यापक खान,डॉ.पटले उपस्थित होते.दोन दिवस चाललेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून संशोधकांना आपले संशोधन सादर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले. विविध विद्याशाखांतील संशोधकांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली आणि भविष्यातील संशोधनासाठी नवीन संधी व दिशा निर्माण झाल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मनोहर बांद्रे यांनी आभार प्रदर्शन करून परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवर, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, तांत्रिक सत्रांचे अध्यक्ष, परीक्षक आणि आयोजन समितीतील सदस्यांचे आभार मानले.
एकूणच, ४०० हून अधिक नोंदणी, सुमारे ३०० संशोधन पेपर सादरीकरण आणि आठ तांत्रिक सत्रांच्या माध्यमातून महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे आयोजित ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी ठरली. या परिषदेने महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि वैज्ञानिक वाटचालीत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून परिसरातील संशोधन संस्कृतीला नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे.या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजना साठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी यानीं विशेष परिश्रम घेतले.






