साहित्य वर्तुळातून अभिनंदनचा वर्षाव…
चंद्रपूर
साहित्य वर्तुळात स्वतःच्या लेखणीने वेगळा ठसा उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक नाट्यकर्मी, कादंबरीकार प्राचार्य डॉ श्याम मोहरकर सर यांच्या “लालगुंजी” या कादंबरीला गडचिरोली येथील नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङमय पुरस्कार नुकताच जाहीर झाला.
विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात स्वतःच्या लेखणीने साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे प्राचार्य डॉ श्याम मोहरकर यांच्या लालगुंजी या कादंबरीला कादंबरी विभागातील प्रथम पारितोषक नाट्यश्री कला मंच गडचिरोलीच्या वतीने नुकताच जाहीर झाला. त्यांच्या लालगुंजी या कादंबरीला हे चौथे राज्यस्तरीय पुरस्कार आहे हे विशेष.
प्राचार्य डॉ श्याम मोहरकर यांनी लिहिलेली लालगुंजी ही कादंबरी विदर्भातील झाडीपट्टी भागातील झाडीबोली या बोलीभाषेतून लिहिलेली आहे. ग्रामीण भागातील काबाडकष्ट करणाऱ्या एकल स्त्रीच्या वाट्याला आलेल्या दुःखद जीवनानुभवाचे व तिने केलेल्या कठोर संघर्षाचे हृदय द्रावक चित्रन प्रातिनिधिक स्वरूपात या कादंबरीत केलेले आहे. ही प्रादेशिक कादंबरी आहे. या कादंबरीतून झाडीबोली या बोलीभाषेतील भाषिक वैशिष्ट्य महाराष्ट्रातील वाचकवर्गाला विशेषत्वाने जाणवेल व या बोली भाषेच्या प्रेमात पडेल हे खास. या कादंबरीला महाराष्ट्रातील वाचक, साहित्यिक प्रेमी मंडळींनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली आहे. आणि म्हणूनच अल्पावधीतच या कादंबरीला चौथे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेले आहे.
नाट्यश्री संस्थे तर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङमय पुरस्कार २० डिसेंबर २०२६ रोज रविवारला गडचिरोली येथे आयोजित भव्य समारोहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. प्राचार्य डॉ श्याम मोरकर यांच्या लालगुंजी या कादंबरीला मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे साहित्यिक परिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






