अकोला
मराठी विषय इयत्ता १२ वी पर्यंत सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्याच्या शासन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी आगामी शैक्षणिक सत्रापासून (२०२५-२६) करण्यात यावी, या मागणीसाठी आज दि. २ एप्रिल २०२५ रोजी अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी शासनाने काढलेल्या आदेशानुसार, सर्व विद्याशाखांमध्ये इयत्ता १२ वी पर्यंत मराठी विषय शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आदेशाची त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाने संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हास्तरीय निवेदने सादर करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
आज अकोला जिल्हाधिकाऱ्यांना या आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा निलेश पाकदुने (जिल्हाध्यक्ष ), प्रा. संजय गोळे (जिल्हा सचिव), उपाध्यक्ष – प्रा. राहुल महाजन सर, उपाध्यक्ष -प्राचार्य विलास बेलूरकर सर, कोषाध्यक्ष – प्रा गणेश सातपुते सर व अमोल जती, प्रा. संतोष हाडोळे सर, प्रा. वासुदेव डांगे सर , सहसचिव – प्रा. अश्विनी बाहकर मॅडम , प्रा ठाकरे मॅडम , सल्लागार सदस्य प्रा अनिल शेलकर सर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
मराठी भाषेला आवश्यक तो मान आणि संरक्षण मिळावे, तसेच विद्यार्थ्यांना मातृभाषेतील शिक्षणाची संधी मिळावी, या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक संघटना एकत्र येऊन हा उपक्रम राबवत आहेत. जिल्हा स्तरावर दिलेल्या या निवेदनाद्वारे शासनाच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ या संघटनेची मागणी आहे.






