spot_img
spot_img
22.3 C
New York
Monday, June 8, 2026

कविता ही एक महत्वपुर्ण वाङमयीन घटना आहे- दा. गो. काळे

स्मृतिगंध काव्य संमेलन हा कवींसाठी कुंभमेळा…

विदर्भातील गाजलेल्या विविध कवींचा सहभाग

भद्रावती

         “कविता ही काळाच्या अस्वस्थतेला व्यापक अर्थ देणारी वाङमयीन घटना आहे. काळाचा सत्यावलंबी आलेख ती प्रस्तुत करीत असते. त्यामुळे ही कविता पुढे कोणते संचित ठेवणार आहे? कोणत्या गर्भिताचे सूचन करणार आहे? काही नाविन्यपूर्ण ऐवज तिने आपल्या गाठीशी बांधला आहे का? जाणते अजाणतेपणी काही गोष्टी टाकल्या आहेत का? हे आपल्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न आहेत. जे वारंवार अभ्यासकांकडून उपस्थित केले जातात. त्यामुळेच कविता ही एक महत्वपूर्ण वाङमयीन घटना ठरते.” असे मार्मीक विधान ज्येष्ठ समीक्षक, प्रख्यात साहित्यिक दा. गो. काळे यांनी स्मृतिगंध काव्य संमेलनाचे निमित्ताने केले. स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावतीच्या वतीने आयोजित आठव्या विदर्भस्तरीय स्मृतिगंध काव्यसंमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदावरून अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज आस्वले भद्रावती, ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना. गो. थुटे वरोरा, डॉ. बळवंत भोयर नागपूर, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीपाद जोशी चंद्रपूर, प्रख्यात कवयित्री डॉ. विशाखा कांबळे नागपूर, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
             काळाच्या वेगवेगळ्या अवस्थांमधून कवितेच्या एकंदर झालेल्या घडणीची स्थित्यंतरे मांडतांना श्रीयुत काळे पुढे म्हणाले की,“ चांगली कविता आपलं वास्तव रूप घेऊन प्रकटत असते. ती केव्हाही सत्याच्या बाजूची असते. लोकानुकंपा हे तिचं सामर्थ्य असते. सामाजिक परिवेषामध्ये तिचं पूर्ण स्वातंत्र्य घेऊन ती येत असते. मराठी कवितेची संत परंपरा तपासली असता असे निर्दशनास येते की, उदंड अशी कविता ही जनसामान्याच्या बाजूची होती. भक्कम असे सामाजिक परिमाण तिला लाभलेले होते. व्यवस्थेविरूद्धच्या सामूहिक नकारामध्ये सर्वसामान्याच्या हिताचे चिंतन करताना कविता दिसत होती. आजचे वास्तव तपासताना ग्लानी आलेल्या समाजाला मात्र हे शक्य होत नाही.आजही व्यवस्थेची पाठराखन करणाऱ्या टाऊळक्यासारख्या उगवलेल्या प्रवृत्ती सर्वत्र विखुरलेल्या दिसत असतात. या प्रवृत्तीची पाठराखण करणाऱ्या व्यवस्थेविरूद्ध चांगली कविता ही ठामपणे उभी राहत असते.”

या संमेलनाचे निमित्ताने उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज आस्वले म्हणाले की, “साहित्य हे समाजनिर्मितीचं काम करणारे एक सशक्त माध्यम आहे. त्यातूनच समाज व राष्ट्रनिर्मितीची बिजे रोवल्या जातात. स्मृतिगंध हा भद्रावती शहरात सातत्याने होत असलेला उपक्रम असून, चांगल्या समाजाच्या निर्मानाकरीता अशा साहित्यिक उपक्रमाची आज समाजाला गरज आहे” असे आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 
                    संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये संमेलनाध्यक्ष दा.गो.काळे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत कवींचे बहारदार कविसंमेलन संपन्न झाले. विदर्भातील  अनेक प्रतिभाशाली कवींनी आपल्या सादरीकरणाने काव्यरसिकांची मने जिंकली. या प्रसंगी काव्यमंचावर आचार्य ना.गो. थुटे, डॉ. बळवंत भोयर, डॉ. विशाखा कांबळे या मान्यवरांची उपस्थिती होती. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ गझलकार राम रोगे यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतिगंध गझल मैफिल संपन्न झाली. याप्रसंगी जयवंत वानखेडे कोरपना, सुरेश शेंडे गडचिरोली, प्रवीण तुरानकर राजुरा, गौतम राऊत ब्रम्हपुरी या मान्यवर गझलकारांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. मैफिलीमध्ये विदर्भातील प्रथीतयश गझलकारांचा समावेश होता. सर्वच गझलकारांच्या बहारदार सादरीकरणाने संमेलनात रंगत भरली. 

ʻगोंडवनातल्या कविताʼ या समारोपीय सत्रामध्ये प्रख्यात कवी बी.सी. नगराळे चंद्रपूर, यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कविसंमेलन पार पडले. या प्रसंगी काव्यमंचावर ज्येष्ठ कवी पंडीत लोंढे वरोरा, तनुजा बोढाले चंद्रपूर, भारती लखमापुरे वरोरा, संगिता धोटे राजुरा, शंकरराणा वाणी भद्रावती या मान्यवर कवींची प्रमुख उपस्थिती होती. समारोपिय कविसंमेलनात प्रतिथयश व नवोदित कवी यांची काव्यमय जुगलबंदी यावेळी अनुभवास मिळाली. नवोदितांच्या काव्य सादरीकरणाने या क्षणी रसिकांची मने जिंकली.

             उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन निवेदिका सौ. केशनी ज्ञानेश हटवार भद्रावती, यांनी केले. डॉ. किशोर कवठे राजुरा, यांच्या सुत्रसंचलनाने निमंत्रितांच्या कवीसंमेलनात जान फुंकली. मंगेश जनबंधू ब्रम्हपुरी यांच्या बहारदार सुत्रसंचलनाने गझल मैफिल सजली तर गोंडवनातल्या कविता या समारोपीय सत्रात विवेक महाकाळकर भद्रावती यांच्या सुत्रसंचलनाने रसिकांची मने जिंकली. संमेलनाचे संयोजक प्रवीण आडेकर, समन्वयक अनिल पिट्टलवार, व प्रा. स्वाती गुंडावार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सुधिर मोते, डॉ ज्ञानेश हटवार, शालीक दानव, सु.वि. साठे, प्रशांत उज्ज्वलकर, रमेश भोयर, प्रकाश पिंपळकर, सुमीत पुनवटकर ईत्यादींचे सहकार्य लाभले.
spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!