आपापली कामे थांबवत हजारो समाज बांधवांची उपस्थिती.
जय संताजी च्या जयघोषाने भिसी नगरी दुमदुमली
६५ वारकऱ्यांचा रिंगण सोहळा विशेष आकर्षण
इतर समाज बांधवांकडून सुध्दा अल्पोहार, चहा, शरबत, गोड पदार्थांचे चौकाचौकात वाटप
आदल्या दिवशी सायंकाळी बाईक रॅली चे आयोजन त्यामूळे वातावरण ढवळून निघाले
प्रतिनिधी भिसी:
तेली समाज पंचकमेटी भिसी, श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव समिती व संताजी महीला मंडळ यांच्या संयुक्त वतीने भिसी येथे दिनांक ८ डिसेंबर २०२४ ला श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचां ४०० वा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला. या जयंती उत्सव सोहळ्या निमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती उत्सव थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यात ६५ लोकांचे वारकरी मंडळ विशेष आकर्षण होते. या सोहळ्यात वारकरी मंडळींनी रिंगण सोहळा घेऊन भिसी वासियांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तसेच या पालखी सोहळ्यात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मापासून तर , त्यांचे विवाह, कुटुंब, इंद्रायनी नदीमध्ये समाज विद्रोही लोकांनी संत तुकाराम महाराज यांच्या बुडविलेल्या गाथा लिहून काढणे , तेल काढण्याचा घाना, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत विठ्ठल माऊली अशा विविध प्रकारच्या जिवंत झाक्या गावातील मुख्य मार्गाने काढून श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसी च्या प्रांगणात नेत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे जीवचरित्र समजावुन सांगण्यात आले.

या जन्मोत्सव कार्यक्रमाकरिता गावातील मुख्य मार्गावर भव्य स्वागत गेट उभारण्यात आले होते. पालखी सोहळ्याचे चौकाचौकात पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले तसेच या पालखी सोहळ्याकरीता गावातील चौकाचौकात अनेक मंडळ व इतर समाज बांधवांकडून अल्पोहार, चहा आणि शरबत चे स्टॉल लाऊन वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी उदयपाल वणीकर महाराज यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . उदयपाल वणीकर महाराज यांनी आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजातील लोकांना शिक्षण, व्यवसाय व समाजात एकता असावी तसेच संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व तेली समाज भिसी च्या दिनदर्शिकेचे विमोचन उदयपाल वणीकर महाराज यांचे हस्ते करण्यात आले. सायंकाळी गावातील तरूण मंडळीचा भजनसंध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या तरुण मुलांच्या मंडळींनी संताचे भजन गात भक्तिमय वातावरण निर्माण करत मनोरंजन केले. सरते शेवटी सर्व समाज बांधवाकरीता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते सर्व समाज बांधवांनी भोजनाचा आस्वाद घेतला. या पालखी सोहळ्यात हजारो लोकांनी सहभागी होत समाजाच्या एकतेचे दर्शन दाखवत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील ज्येष्ठ मंडळी, व्यापारी मंडळ, तरुण मुल, मुली, महीला मंडळ व समाजातील प्रत्येक घटकानी आपापल्या परीने अथक परिश्रम घेतले.






