विदर्भात चंद्रपूर लोकसभा निवडणूक होणार अत्यंत चूरशीची
चंद्रपूर: चंद्रपूर आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने माजी खासदार व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा पत्ता कट करून राज्याचे हेवी वेट मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी बहाल केली आहे. तर काँग्रेस पक्षाने दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना काँग्रेस पक्षाने मैदानात उतरवले आहे.
मात्र 2019 च्या निवडणुकीपेक्षा यावर्षी राजकीय वातावरण वेगळ्या वळणावर आहे. इंडिया आघाडीच्या वतीने प्रतिभा धानोरकर यांना भरघोस पाठिंबा जाहीर करत 27 मार्च रोजी भव्य शक्ती प्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनात सर्व सहाही विधानसभा क्षेत्रातील आघाडीतील सर्व घटक पक्ष व त्यांचे कार्यकर्ते नेते हीरहिरीने उपस्थित होते. हे शक्ती प्रदर्शन काँग्रेसच्या उमेदवारासाठी अधिकच बळकटी देणारे ठरले. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाला सर्वत्र जनता कंटाळलेली पाहायला मिळत आहे. बेरोजगारीची समस्या, शिक्षण क्षेत्रात समस्यांचे जाळे, शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी केलेले प्रयत्न, हमीभाव मिळत नाही, ओबीसी समाजाचे प्रश्न, असे अनेक प्रश्न नागरिकांपूढे आहेत. या सर्व प्रश्नांना सुधीर मुनगंटीवार काय उत्तर देणार ! व यांचा करिष्मा चालणार काय?. कारण भाजप हा पक्ष बहुजन विरोधी, संविधान विरोधी, शिक्षणविरोधी असल्याचे सामान्य मतदार बोलून दाखवत आहे. ओबीसीबहुल अशा प्रदेशात ओबीसी ला डावलून भारतीय जनता पार्टीने अल्पसंख्यांकांना खासदारकीची तिकीट दिली.
प्रत्येक राजकीय पक्षात पक्षांतर्गत गटबाजी थोडीफार आहे. परंतु या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात ही गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र 27 तारखेच्या शक्ती प्रदर्शन व निर्धार सभेच्या वेळेत सिद्ध झाले. काँग्रेस पक्षाचे व समविचारी पक्षाचे कार्यकर्ते धानोरकर ताईंच्या पाठिंबासाठी सर्व मतभेद विसरून एकाच मंचावर, एकाच मैदानात उपस्थित होते. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसमधील गटबाजी तूर्तास संपुष्टात आली असून धानोरकरांच्या विजयासाठी सर्वांनी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 27 तारखेला प्रतिमाताईंनी फॉर्म भरल्यानंतर झालेल्या सभेत अनेक राजकीय पुढार्यांनी आम नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. यात राजेश बेले यांनी व वंचित आघाडी कडून फॉर्म भरला आहे ते किती प्रभाव करतात यावरही पुढील गणित अवलंबून राहील.
मागील निवडणुकीत पंतप्रधान मोदींची सर्वत्र हवा चालत असताना ओबीसी प्रवर्गाने एकजुटीने ओबीसी चंद्रपूर चा उमेदवार निवडून आणला हे विसरण्याजोगे नाही. आता कुठे खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा सुरू झालेला आहे. यापुढे कोण आघाडी घेणार हे काळच ठरवेल . एकंदरीत सहापैकी सहाही विधानसभा क्षेत्राचा सध्याचा राजकीय आढावा घेतला असता काँग्रेसच्या उमेदवारासाठी वातावरण अनुकूल की भाजपाच्या उमेदवारासाठी अनुकुल राहणार हे येणारा काळच सांगेल.






