भद्रावती : नव्या शैक्षणिक धोरणामुळे रोजगाराच्या नव्या नव्या संधी वाढणार आहेत. जुने रोजगार काही प्रमाणात कमी होत असले तरी नवे तंत्रज्ञान आणि जुन्या पारंपारिक ज्ञानाचा वापर करून, त्यांचा ताळमेळ साधून आपल्याला पुढे जायचे आहे. इंग्रज सरकारला या देशावर राज्य करायचे असल्याने त्यांनी येथील मूळ शैक्षणिक व्यवस्था डळमळीत करून आपले राज्य टिकविण्याचे काम केले. भारत देश ज्ञानाचे भंडार आहे. या ज्ञानाचा वापर करीत आपल्याला शिक्षणक्षेत्र विकसित करायचे आहे असे विचार गोंडवाना विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी व्यक्त केले. भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘बदलती शिक्षणप्रणाली’ या विषयावर आधारित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे होते. यावेळी मंचावर श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिंपरी वर्धा येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कालभूत, छत्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा चंद्रपूर येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. दिलीप चौधरी, नुटा या प्राध्यापक संघटनेचे सचिव प्राचार्य विलास ढोणे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. डॉ. चौधरी यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि अंगी चिकाटी असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर या परीक्षेत कोणताही विद्यार्थी रिकाम्या हाताने परत जात नाही. तयारीत प्रामाणिकता असेल तर या परीक्षेतून आयुष्यात कुठल्या ना कुठल्या परीक्षेत यशस्वी होतोच. त्यामुळे स्वप्ने मोठी पहा व जीवनात यशस्वी व्हा असा मंत्र दिला. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. ज्योती राखुंडे, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, आभारप्रदर्शन डॉ. सुधीर आष्टुनकर यांनी केले. विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या कार्यशाळेला भद्रावती शहरातील ज्येष्ठ नागरिक, पालक, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, महिला तथा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






