भद्रावती : देशाची भावी पिढी सुसंस्कारित घडावी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शैक्षणिक शिक्षणा व्यतिरिक्त जीवन शिक्षणाचे आदर्श धडे विद्यार्थ्यांना देऊन आदर्श नागरिक घडावेत या उद्देशातून लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व लोकमान्य ज्ञानपीठ भद्रावती चे वतीने विद्यालयाचे सभागृहामध्ये व्यक्तिमत्व विकास सुसंस्कार शिबिर पार पडले. १०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आदर्श जीवनाची कला,आत्मसंरक्षण, नेतृत्व क्षमता, एकीचे बळ यांचे धडे देण्यात आले.

चार दिवस चाललेल्या अनिवासी शिबिराची सुरुवात सकाळी ६.३० वाजता प्रात: प्रार्थनेने होऊन त्यानंतर योगासने, कराटे, लाठी काठी, बांबू डान्स, कवायत, बौद्धिक तासीका, संगीत तासिका, श्र्लोक पाठांतर, क्राफ्ट तासिका व शेवटी सामुदायिक प्रार्थनेने विद्यार्थ्यांच्या दिनचर्येचा शेवट होत होता. शिबिराचे समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात गुरुदेव हमारा प्यारा या संकल्प गीताने होऊन शिबिरात शिकविलेल्या प्रशिक्षणाचे विद्यार्थ्यांनी आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना आम्हाला शिबिरातील खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्यामधे आदर्श दिनचर्या, आई ,वडिल,गुरूंचा आदर कसा करावा यांचे महत्त्व कळले असे मत व्यक्त केले.लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी गुंडावार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मनोहरराव पारधे, अमित गुंडावार,उल्हास भास्करवार, गोपाळराव ठेंगणे, नामदेवराव कोल्हे, उमाकांत गुंडावार ,संजय पारधे, गुणवंत कुत्तरमारे,क्षितिज शिवरकर,अनंता मते, प्राचार्य आशालाता सोनटक्के ,उपप्राचार्य सचिन सरपटवार ,पर्यवेक्षक रूपचंद धारणे तसेच लोकमान्य ज्ञानपीठ प्राचार्य पूनम ठावरी उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल गावंडे यांनी केले तर आभार राजेश्वर मामीडवार यांनी मानले.शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या अनेक पालकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले,शिबिराच्या यशस्वीते करिता शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी ,पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






