spot_img
spot_img
22.3 C
New York
Thursday, July 30, 2026

लालगुंजी : अनात्मवादी स्त्री संघर्षाची आत्मवादी संघर्षधारा… जयश्री पवार

चंद्रपूर

कादंबरीकार डॉ.श्याम मोहरकर ह्यांनी त्यांची ‘लालगुंजी’ ही कादंबरी प्रकाशनापूर्वीच मला समीक्षणात्मक अभिप्रायासाठी पाठवून दिली. झाडीपट्टी रंगभूमीचे अभ्यासक, कलावंत, नाट्यकर्मी, सेवानिवृत्त प्राचार्य, लेखक, समीक्षक अशी डॉ. मोहरकरांची ठळक ओळख असून ‘लालगुंजी’ ही त्यांची पहिलीच कादंबरी. शहरातच लहानाची मोठी झाल्याने मला ग्रामीण भागाचं थोडं जास्तच अप्रूप. लहानपणापासूनच वाचनाची गोडी व अगदी सुरुवातीच्या काळात व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, राजन गवस, वासुदेव मुलाटे ह्यांच्या बऱ्याच ग्रामीण कथा वाचनात आल्यामुळे ग्रामीण साहित्याची गोडी वृद्धिंगत झाली.


खरंतर ग्रामीण साहित्य म्हणजे पिढ्यान् पिढ्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने घेतला जाणारा आत्मशोध. डॉ.श्याम मोहरकरांची ‘लालगुंजी’ ही अशीच एक दर्जेदार साहित्यकृती. भूतकाळाच्या डोहातून बाहेर येऊ पाहणारी अशी संघर्षधारा जी वर्तमानातील अनेक वास्तववादी घटनांची साक्ष देत वाचकांच्या काळजाला हात घालते. मुळातच कादंबरी ही एक दीर्घ लेखनप्रक्रिया जरी असली तरी तितकाच चिंतनात्मक व वास्तवाकडे नेणारा एक कालप्रवाह असतो. ग्रामीण सामाजिक वास्तव व राजकीय परिणामांना सामोरे जात एका अनोळख्या वळणावरती स्त्री संघर्षाचा वेध घेत तीन पिढ्यांचा शब्दपट कादंबरीच्या रूपात मांडणे हे तसेही मोठं धारिष्ट्याचे काम. असं असूनही कादंबरीच्या मूळ कथानकाला धक्का न लावता लेखकाच्या दृष्टीपटला समोरचा तीन पिढ्यांचा संघर्षात्मक भूतकाळ अतिशय जबाबदारीने आणि परिस्थितीजन्य असं लेखन करत लालगुंजीच्या रूपाने संपन्न झालेलं दिसून येतं. ग्रामीण वास्तव, भाषा, दारिद्र्य व्यथा, अडाणीपणा, माणसामाणसाच्या स्वभावातील भोळेभाबडेपणा ह्यांचा शब्दचित्रपट वाचकांच्या डोळ्यांसमोर प्रभावीपणे उभा करण्यास लेखक नक्कीच यशस्वी झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कादंबरीच्या निमित्तानं जीव ओतून केलेले संवेदनशीलात्मक लिखाण, ग्रामीण बोली, परिस्थितीजन्य स्त्री संघर्ष ‘दुर्गाच्या’ रुपाने वाचकांच्या भेटीस येतो व कथानकाला न्याय देऊ पाहतो. समाजचित्रणाच्या दृष्टीने कादंबरीस अनेक पैलू आहेत. स्त्रीविषयक उन्नत भावांची चित्रे कादंबरीत समर्पकपणे रेखाटली गेली आहेत. स्त्रीसंघर्ष व वास्तविक जाणिवांचा सखोल आणि सर्वांगीण आविष्कार कादंबरीची नायिका दुर्गाच्या रूपाने वाचकांच्या पसंतीस उतरतो.

स्त्री चित्रण हा मोहरकरांच्या खास प्रज्ञेचा अभिनव असा आविष्कार आहे. स्त्री जीवनाच्या प्रीतबंधातील संवेदना, सूक्ष्मता दुर्गा आणि नीलकंठच्या पात्रातून समर्पकपणे रेखाटण्यात आलेल्या आहेत. गावगाड्यातील दुःख, व्यथा, संघर्ष, प्रतिकाराची परंपरा कथानकात केंद्रवर्ती भूमिकेत आहेत असं माझं प्रांजल मत. लोकवस्ती, जीवनशैली, शेती, दैनंदिन जीवन, सुगी, शेतीची कामे, लोकव्यवहाराची सूक्ष्म संवादचित्रे कादंबरीत समाविष्ट आहेत. उत्सववादी प्रसंग व श्रद्धाभाव विशेष उल्लेखनीय आहेत. गावगाड्यातील सामाजिक भेदाचे व विषमतेचे चित्रण यात ठळकपणे समाविष्ट करण्यात आलेले आहे. नागर भाषेचा मुक्तावकाश, सर्जनशीलतेचा वापर व त्यातील निर्भयपणा, मोकळीकता सजगपणे मांडण्यात आलेली आहे. कादंबरीस प्रसंगपरत्वे कृतज्ञता भावाने लिहिलेले अनेक छोटे-मोठे प्रसंगवर्णन व व्यक्तिगत भावसंबंधांची सुंदर किनार आहे. सत्तरच्या दशकातील भारताच्या राजकारणाची अंतर्भेदी मीमांसेची जोड तसेच जागतिकीकरणाच्या अनेक बदलांचे संदर्भसुद्धा मोहरकर कादंबरीच्या निमित्ताने वाचकांना देऊ पाहतात.


लालगुंजीस राजकीय घटनांचा ओलावा देत ते समतेची व विश्वबंधुतेची साखळी गुंफू पाहत आहेत. मानवतावादाचा विशाल व व्यापक कथापट ह्या कादंबरीत सामावलेला आहे. समाजशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचा वाटावा असा दस्तावेज कादंबरीत नमूद केला आहे. कादंबरीच्या आरंभी.. जाणिवांचे प्रगटीकरण आहे तर मनातील खंडित नेणेवेतील वास्तवाची सरमिसळ शब्दरूपात कादंबरीच्या उत्तरार्धात आपल्याला वाचावयास मिळते. लालगुंजीतील चिंतनात्मक पसाऱ्यामुळे पात्रांची व्याप्ती वाढली आहे. नर्मदा आजी, शिवराम, पार्वती,नसाळी मावशी पोगळे गुरुजी,सोनबा, बिलवणे गुरुजी,गीता,नीलकंठ,नागेश्वर, रामजी,रामू पाटील,गणेश, विठोबा अशा बऱ्याच बहुआयामी पात्रांची निवड चोखंदळपणे केली गेलेली आहे. परंपरेतील आत्मवादी आणि अनात्मवादी झगड्याच्या संघर्षाचा संदर्भ कथानकाला आहे. कादंबरीत स्त्री प्रतिमानाच्या स्थितीशील स्वरूपाचा ढाचा असूनही तिच्या भावविश्वाला बहूविविध पैलू आहेत. कादंबरीस भूतकाळातून वर्तमानाकडे वाहणाऱ्या इतिहासाला काही विशिष्ट घटना व शब्दरचनेचे अनोखे प्रवाहीपण आहे ही जमेची बाजू. गावगाड्यातील काही सकारात्मक घटनांचा मानवी जीवनावर होणारा परिणामही कथानकात आपली खोलवर छाप सोडतात व दीर्घकाळ स्मरणात राहतात.
आजमितीला ग्रामीण साहित्याचं पीक फोफावलेलं असतानाही लालगुंजी ही कादंबरी वाचकांच्या चिरकाल स्मरणात राहील अशी आहे ; आणि ह्याचे सर्व श्रेय डॉ.मोहरकरांना जाते. एखाद्या दर्जेदार साहित्यकृतीत असणारे सर्वांगीण चाकोरीबद्ध लिखाण असलेली ही कादंबरी सर्वांनी एकदा तरी वाचावी अशीच आहे. डॉ. मोहरकर ह्यांच्याकडून भविष्यात असचं उमदं व सकस साहित्य लिहिलं जावो ही सदिच्छा.

सौ.जयश्री महेंद्र पवार
मीरा भाईंदर, ठाणे.
9987334731

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!