भद्रावती : तालुक्यातील नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील नागरिकांना आजही पुलाच्या अभावामुळे प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शाळकरी लहान मुले तसेच गंभीर रुग्णांना पावसाळ्यात नदी पार करायसाठी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हा प्रश्न आता नागरिकांच्या जगण्या मरण्याचा बनला आहे.
नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नासाठी २०१८ साली चांदा ते बांदा योजनेत पुल बांधण्याचे काम सुरू झाले होते. मात्र भ्रष्टाचाराच्या काळ्या पंजात अडकून ते काम अपूर्णच राहिले. आजही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
याविषयी शिवसैनिकांनी तहसील कार्यालय भद्रावती येथे निवेदन दिले.

काय आहेत मागण्या :
संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी व कठोर कारवाई करावी.
सात दिवसांच्या आत अपूरे राहीलेले पुलाचे काम पूर्ण करा.
पुलाचे काम का बर नाही झाले? याची सखोल चौकशी करा. नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेला जबाबदार धरले जावे.
सात दिवसात ही सर्व काम पूर्ण न झाल्यास, शिवसेनेच्या वतीने समस्त पीडित नागरिकांना घेऊन तहसील कार्यालयासमोर आंदोलन उभारले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.
असे निवेदन शिवसैनिक सुरज शाहा यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा शिवसैनिक सुमित हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा शिवसैनिक निलेश उरकुळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेबांना देण्यात आले. यावेळी उप तालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम, चंदू मडावी, रवींद्र वाटेकर, संदीप नागपुरे, कादर खान पठाण, रेखा ताजने, संगीता शिवरकर, व समस्त नंदोरीवाशी उपस्थित होते.






