मुंबई : राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुका निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असुन अधिकाधिक मतदारांनाही सहभागी व्हावं असं आवाहन भारत निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुंबईत वार्ताहर परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
राज्यामध्ये साडेनऊ कोटी मतदार हे 288 मतदार संघात असून सुमारे एक लाखाच्या वर मतदान केंद्रे या निवडणुकीत असतील. काही शहरी भागात नक्षलग्रस्त भागाच्या तुलनेत ही कमी मतदान होत असल्याने शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नवमतदार तसेच इतर मतदारांना मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी व्यापक मतदार जागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राजीवकुमार यांनी सांगितलं.

शहरी भागातल्या जवळपास १०० टक्के आणि ग्रामीण भागातल्या ५० टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टींगची सुविधा दिली जाणार आहे. शेजारील राज्यातून अवैधरीत्या होणारी रोख रक्कम, अमली पदार्थ, मद्य आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ३२२ चेक पोस्ट निर्माण करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकीतील गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सी विजील सारख्या मोबाईल अॅपची देखील माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.






