भद्रावती : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांची निवड होत असल्याची चर्चा सध्या जोरात वेग घेत आहे. साहित्य, कला, सामाजिक, आदी
क्षेत्रातील मान्यवरांची शिफारस सरकार राज्यपालांकडे करत असते. साहित्य क्षेत्रातून सुप्रसिद्ध साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांना संधी द्यावी,अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या विदर्भ महिला आघाडी अध्यक्ष संगीता बांबोळे, उपाध्यक्ष सुवर्णा पिंपळकर, सरचिटणीस ललिता वसाके कार्याध्यक्ष कल्पना टेंभुर्णीकर, कल्पना निबोंकार आदींनी केली आहे. तसेच राजकीय पर्यावसन म्हणून कुणाचीही वर्णी लावू नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.सन १९९३ साली त्यांनी साहित्य परिषदेची स्थापना केली.साहित्य परिषदेचे २० हजार सभासद असून आजवर संस्थेने १५० हून अधिक साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे.त्यांनी महाराष्ट्रासह महाराष्ट्रा बाहेर देखील अनेक राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय संमेलने घेतलेली आहेत.नवोदित मराठी साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन,महात्मा फुले साहित्य संमेलन,छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, बेळगाव मराठी साहित्य संमेलन,ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आदी संमेलनाचे यामध्ये समावेश आहेत. साहित्यिक शरद गोरे यांनी एकूण १० ग्रंथाचे लेखन केलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहीलेला बुधभूषण ग्रंथ हा त्यांनी मराठी भाषेत भाषांतरित केला आहे. त्यामुळे बुधभुषणकार अशी त्यांची ख्याती आहे. उत्तम शिवव्याख्याते म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत. आजवर विविध विषयांवर त्यांनी हजारो व्याख्याने दिलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांमध्ये त्यांची निवड करून संधी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.






