मराठी विषय बारावी पर्यंत अनिवार्य करण्याची मागणी
त्रिभाषा धोरण समिती अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव यांना निवेदन
सांगली प्रतिनिधी:
इयत्ता बारावी पर्यंत मराठी विषय अनिवार्य व सक्तीचा करावा असे निवेदन त्रिभाषा सूत्र धोरण निश्चिती समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांना कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य कोषाध्यक्ष प्रा. डॉ दिलीप जाधव व कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. बाबासाहेब माळवे यांनी दिले.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणी ताराबाई सभागृहात त्रिभाषा धोरण निश्चिती करण्यासाठी समितीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली. या समितीचे सदस्य डॉ. अपर्णा माॅरिश, भाषा वैज्ञानिक डॉ. सोनल कुलकर्णी -जोशी, शिक्षणतज्ज्ञ डॉ. मधुश्री सावजी, बालमानसतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक सौ. प्रभावती कोळेकर, सहा. शिक्षण उपसंचालक सौ .अनुराधा म्हेत्रे, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक संघटना, शिक्षक, प्राचार्य, प्राध्यापक, पालक यांची मते जाणून घेतली. व त्रिभाषा धोरण निश्चिती समितीने प्रश्नावली, मतावली लिखीत स्वरुपात भरुन घेतली. कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य कोषाध्यक्ष प्रा. डॉ दिलीप जाधव यांनी आपले मत मांडले. बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरणाला प्रखर विरोध विरोध नोंदवला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. राज्य शासनाने इयत्ता बारावी पर्यंत मराठी विषय शक्तीचा असा निर्णय सप्टेंबर २०२४ घेतला आहे. मात्र महाराष्ट्रात त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापेक्षा अप्रत्यक्षरीत्या हिंदी भाषेची सक्ती करण्याचे धोरण दिसत आहे. त्रिभाषा धोरण निश्चिती करताना मराठी भाषा विषय इयत्ता बारावी पर्यंत अनिवार्य व सक्तीचा करावा अशी मागणी केली व भविष्यात मराठी भाषा संवर्धन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. बाबासाहेब माळवे, सचिव प्रा. मधुकर कांबळे, प्रा. सुरेश मसुटे व मराठी विषय शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.






