भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी भद्रावती नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विजासन येथील सेंद्रिय खत प्रकल्पाला भेट देऊन तेथील तांत्रिक बाबींचा अभ्यास केला. यावेळी टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ आणि आकर्षक वस्तू कशा बनवायच्या याचे प्रशिक्षण आणि त्यांचे मार्केटिंग कसे करायचे याबाबत सविस्तर माहिती घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर केवट यांनी दिली. यासोबतच सेंद्रिय खत, गांडूळ खत तयार करण्याविषयीची प्रकिया उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यवस्थापक केवट यांनी संकलित कचऱ्यापासून टाकाऊ प्लास्टिकला वितळवून त्यापासून कचराकुंड्या,खुर्च्या, टेबल, खेळणी तयार करतात. अन्य कचऱ्यापासून सेंद्रिय खत कसे तयार केले जाते याविषयी माहिती दिली. विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे यांच्या मान्यतेने यावेळी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसह वाणिज्य विभागप्रमुख डॉ. विजय टोंगे, डॉ. उत्तम घोसरे, डॉ सुहास तेलंग यांच्यासह ५३ विद्यार्थी, विद्यार्थ्यांनींनी सहभाग घेतला.






