शाळेत जाण्यासाठी काढावा लागतो साचलेल्या पाण्यातून रस्ता
दि. ७ ऑगस्ट
भद्रावती तालुक्यातील शेगाव (खु) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधे जाण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना सध्या दररोज खड्या मधे साचलेल्या पाण्यातून रस्ता काढावा लागत आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सगळीकडे पावसाचे पाणीच पाणी आहे. परंतु भद्रावती तालुक्यातील शेगाव खु येथे ईयता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना रोज शाळेमध्ये जाण्यासाठी रस्त्यामध्ये साचलेल्या पाण्यातून जावे लागत आहे. हा रस्ता ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असा जात असून ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्याच्या दोन्ही बाजूला गावातीलच काही नागरिकांचे अतिक्रमण आहे. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी दुसरा रस्ता नसल्यामुळे नाईलाजाने त्याच साचलेल्या पाण्यातून विद्यार्थ्यांना रस्ता काढावा लागतो. गावातील काही नागरिकांनी या बद्दल ग्रामपंचायतला तक्रार केली असता त्यांचेकडून कुठलीच हालचाल करण्यात न आल्याचे नागरिकांनी सांगितले. जिल्हारिषद शाळेला जाणारे विद्यार्थी हे चिमुकले असल्याने रोज या पाण्यातून जाताना त्यांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र आता निर्माण झाला आहे. त्यामूळे या ठिकाणी पडलेला खड्डा लवकरात लवकर बुजवून त्या रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी शेगाव (खु) येथील नागरिक हे करीत आहे.






