भद्रावती : शहरातील स्थानिक NGO हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी, भद्रावती द्वारा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि. ९ ऑगस्टला “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, वर्ष ५ वे, सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा २०२६” आयोजित करण्यात आली.

ही स्पर्धा परीक्षा वर्ग ५ ते ६ ‘अ- ग्रुप’, वर्ग ७ ते ८ ‘ब- ग्रुप’ आणि वर्ग ९ ते १० ‘ क- ग्रूप’ या तीन ग्रुपमध्ये यशवंतराव शिंदे विद्यालय भद्रावती येथे घेण्यात आली. स्पर्धेकरिता भद्रावती शहरातील व आसपास च्या गावांमधील अनेक विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
स्पर्धेचा निकाल १२ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर होणार आहे आणि १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.३० वा. डॉ. आंबेडकर मेमोरियल हायस्कूल भद्रावती येथे स्वातंत्र्य दिनी झेंडावंदन कार्यक्रमांमध्ये संलग्न आयोजित केलेला आहे. या तीन्ही ग्रुपमधील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचा विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तर तीन्ही ग्रुप मधील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर गिफ्ट, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन या सर्वांचा सत्कार करण्यात येणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याच शाळेच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमांमध्ये देण्यात येणार आहेत.
सामान्य ज्ञान स्पर्धा नियोजनबद्ध व उत्कृष्टपणे पार पाडण्याकरिता हेल्पिंग हँड्स NGO चे सर्व पदाधिकारी, सदस्य, मित्र परिवार आणि शुभचिंतक यांनी आपले मोलाचे योगदान आणि सहयोग दिले आहे. तसेच यशवंतराव शिंदे विद्यालय भद्रावती शाळेच्या मुख्याध्यापक, कर्मचारी व इतर सर्वांनी मोलाचे योगदान दिले.






