वरठीत अमराठी भाषिक रिक्षा चालकांसाठी आर टी ओ भंडारा तर्फे कार्यशाळा संपन्न
भंडारा,:-
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात अमराठी भाषिक वाहन चालकांसाठी ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी’ संवाद भाषा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १ जून ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
याच उपक्रमांतर्गत, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय भंडारा च्या वतीने महाराष्ट्र शासनातर्फे मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:३० या वेळेत ग्रामपंचायत सभागृह, वरठी, ता. मोहाडी, जि. भंडारा येथे आयोजित करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील अमराठी भाषिक रिक्षा चालकांना मराठी भाषेचे धडे देण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वांनाच मराठी भाषा बोलता आली पाहिजे हा यामागील हेतू आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीतील सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे हे उपस्थित ह़ोते. प्रमुख पाहुणे म्हणून वरठी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप, कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून प्रा. संजय लेनुगरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय भंडाराचे मोटार वाहन निरीक्षक निलेश दहेकर, प्रशांत ठाकरे, प्रतीक मोहिते उपस्थित होते. सहायक मोटार वाहन निरीक्षक श्री. सागर सराफ, रितेश चव्हाण, विष्णू कुंभलकर आणि सौ. मेघराणी काशीद यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. याशिवाय मालक-चालक रिक्षा असोसिएशन वरठीचे अध्यक्ष मिलिंद धारगावे यांचीही विशेष उपस्थिती होते.
मोफत प्रशिक्षण: महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेत भंडारा जिल्ह्यातील ५९ अमराठी रिक्षा चालकांनी सहभाग घेत मराठी चे प्रशिक्षण घेतले. संवाद कौशल्य: अमराठी भाषिक रिक्षा चालकांना प्रवाशांशी मराठी भाषेत संवाद साधणे सुलभ व्हावे, यासाठी या मराठी भाषेच्या प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित सर्व ऑटो रिक्षा चालकांना रस्ता सुरक्षा शपथ देण्यात आली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्रादेशिक परिवहन भंडारा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.






