संचमान्यतेतून विद्यार्थी वगळले जाण्याची भिती…
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा, शिक्षकांची पदे सुरक्षित ठेवा; विज्युक्टाचे शिक्षण विभागाला निवेदन
चंद्रपूर
शिक्षण विभागात ऑनलाइनच्या नावावर सावळा गोंधळ सुरू आहे. शासनाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून अकरावीत प्रवेश घेतलेले नियमित विद्यार्थी तसेच बारावीच्याही विद्यार्थ्यांना स्टुडंट पोर्टलवर ‘ओव्हर एज’ दाखवून त्यांना संचमान्यतेतून वगळण्यात आले आहे. याशिवाय अशा विद्यार्थ्यांची नावे पोर्टलवर दिसत नसल्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने अशा विद्यार्थ्यांना संच मान्यतेत ग्राह्य पकडण्यात यावे, याबाबतचे निवेदन व्हिजुक्टा संघटने मार्फत शिक्षण उपसंचालक यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
यु-डायस प्लस वर ऑनलाइन जे विद्यार्थी दाखवले जाणार त्यांनाच संचमान्यतेत ग्राह्य पकडल्या जाईल असे अधिकारी सांगत आहेत. याचा फटका अनेक मोठ्या महाविद्यालयांतील बऱ्याच नियमित विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना बसत आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये असे घटनात्मक धोरण असताना सुद्धा, काही विद्यार्थ्यांना ओव्हर एज दाखविले जात आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणारच, पण सोबतच विद्यार्थी संख्या कमी दिसल्याने त्याचा परिणाम वर्ग तुकड्या कमी होवून शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांच्यामार्फत शिक्षण संचालक, पुणे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सहसचिव डॉ. अभिजीत पोटले, नागपूर ग्रामीण अध्यक्ष डॉ. नितीन देवतळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रवीण चटप, प्रा. बागडे, जिल्हा चंद्रपूरचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. नामदेव मोरे, नागपूर शहराध्यक्ष डॉ. चेतन हिंगणेकर यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.






