
भद्रावती :-
भद्रावती नगरपालिकेच्या २०२५ च्या निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस रंगतदार होत चालला असून शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची अक्षरशः लगबग पाहायला मिळाली. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी मिळून तब्बल १८१ अर्ज दाखल झाले असून , यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी यंदा विशेष उत्सुकता पाहायला मिळाली. या पदासाठी १० अर्ज दाखल झाले असून त्यापैकी ७ उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात उतरणार आहेत. यात राजकीय पक्षांकडून ६ उमेदवार, तर १ अपक्ष उमेदवार आपली ताकद आजमावणार आहे. विशेष म्हणजे काही इच्छुकांकडून ३ दोन-दोन फॉर्म भरल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत, ज्यामुळे या पदासाठीची स्पर्धा किती काट्याची आहे, हे अधिक स्पष्ट झाले आहे.
नगरसेवक पदांसाठीही उमेदवारांनी मोठी उत्सुकता दाखवली असून विविध प्रभागातून अर्ज दाखल करण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी दिसून आली. शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालय परिसरात झालेली वर्दळ, कार्यकर्त्यांचा उत्साह, मोटारींची दाटी, आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले.
आता निवडणूक विभागाकडून अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू होणार असून अपात्र व वैध अर्जांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर अंतिम उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होणार आहे. अर्जांची संख्या मोठी असल्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची, थरारक आणि रंगतदार होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भद्रावतीकरांच्या अपेक्षा, गट-तटांचे समीकरण, आणि नव्या उमेदवारांचा उत्साह यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांच्या राजकीय पक्षातील कोलांटउड्या हा राजकारणाचा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. भद्रावतीची राजकीय हवा आता पूर्णपणे तापली असून पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणांमध्ये कोणते बदल घडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नागरिक कोणता निर्णय घेतील यावर सर्व उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.






