
ठाण्यातील घोडबंदर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 35 वर्षीय तरूणाने त्याच्या आई-वडिलांवर चाकूने वार केले. या घटनेत आई विनिता भाटकर (66) यांचा मृत्यू झाला, तर वडील विलास भाटकर (72) यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. आरोपी संकल्प भाटकरने (वय 35) ठाणे पश्चिम येथील घोडबंदर येथील राहत्या घरात गुरुवारी सकाळी 11.15 च्या सुमारास वडिलांवर आणि आईवर चाकूने वार केले. आरोपीच्या वडिलांना ठाण्यातील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कासारवडवली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बॉडीबिल्डर असून तो स्टेरॉईड्स हे ड्रग्ज घेत असे. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे तो मानसिकदृष्ट्या बिघडला होता. तीन महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले, परंतु त्याचे वडील, आई आणि पत्नी यांच्याशी संबंध ताणले गेले. स्टिरॉइड्सच्या सेवनामुळे आलेल्या निराशेमुळे त्याने ड्रग्स वापरणे बंद करावे, असे त्याचे आई-वडील सतत सांगत होते. त्याचाच मनावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
विहंग व्हॅलीतील एका शेजाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले की, “मी संकल्प भाटकरला 2019 पासून ओळखतो. तो फिटनेस उत्साही होता आणि शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेत असे. त्याने 2019 मध्ये बॉडीबिल्डिंगसाठी मुंबई श्री पुरस्कारही जिंकला. मात्र, त्यापेक्षा जास्त गेल्या वर्षी त्याने स्टिरॉइड्स आणि ड्रग्स घेण्यास सुरुवात केली. गुरुवारी त्याने कांदा कटरने वडिलांना आणि आईवर वार केले. हल्ल्यानंतर तो चाकू धरून बाहेर पडला.”
बहिणीला मारण्यासाठी तिच्या शोधात निघाला होता
एका तपासी पोलीस अधिकाऱ्याने खुलासा केला की, “आई-वडीलांवर चाकूने वार केल्यानंतर आरोपी संकल्प भाटकर याने ठाण्यातील कोरल हाईट्स येथे राहणाऱ्या त्याच्या बहिणीला शोधून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो तिला शोधू शकला नाही. त्यानंतर तो दुचाकी घेऊन कुर्ला नेहरू नगर येथील त्याच्या सासू व सासऱ्याच्या घरी गेली. दरम्यान, कासारवडवली पोलिसांनी नेहरूनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि आरोपीला नेहरूनगर पोलिसांनी सासू-सासऱ्यांच्या घरातून अटक केली आणि कासारवडवली पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 302 (हत्या) नुसार गुन्हा दाखल केला आहे.






