भद्रावती
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चीचोर्डी भद्रावती येथे स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ ज्ञानेश हटवार, प्रमुख अतिथी प्राध्यापक किशोर ढोक, प्रा.प्रवीण मत्ते, प्रा संगीता जक्कुलवार हे व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कु. श्रावणी खंडारे, प्रियंका चौधरी, भूमिका लांडगे, सलोनी आडेकर, माही ढोके व समीक्षा शेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. ज्ञानेश हटवार यांनी स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळकांचे कार्य आजरामर आहे. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे थोर साहित्यिक होते. त्यांच्या साहित्याने जीवन संघर्ष टिपून घेतले व जगण्याची नवीन ऊर्जा दिली आहे, असे सांगितले. या दोन्ही महापुरुषांचा आदर्श आपल्या जीवनात स्वीकारून आपण समृद्ध व्हावे, असे मार्गदर्शन केले. प्रा. प्रवीण मत्ते सर यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भीष्माचार्य बोरकुटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वर्षा दोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कमलाकर हवाईकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. प्रेमा पोटदुखे, प्रा. राकेश आवारी , प्रा. प्रणिता बोकडे, प्रा. रमेश चव्हाण आदींनी सहकार्य केले.






