. तिन्ही लेकी ठरल्या मराठीसाठी प्रेरक
चंद्रपूर,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारे नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करून विभागात व जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघातर्फे मराठी विषयात विभागातून प्रथम तीन विद्यार्थी व प्रत्येक जिल्ह्यातील सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन नुकतेच आभासी सभेच्या माध्यमातून करण्यात आले.
यात चंद्रपूर जिल्ह्यातून मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवून अग्रेसर असलेल्या तीन विद्यार्थिनींनी मराठीचा झेंडा अटकेपार नेण्याचे कार्य केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून मराठी विषयात सर्वोत्तम गुण प्राप्त करून शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय व्याहाड (खुर्द) येथील विद्यार्थिनी कु. शिवानी राजू कांबडे हिने ८२% गुण प्राप्त केले व मराठी विषयात ९३ गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम स्थान पटकाविले. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व विषय शिक्षिका प्रा. राखी सुधाकर गोहणे यांना दिले. जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्रवीणा रवींद्र आडेपवार हीने प्राप्त केले. हीने प्राप्त केलेल्या एकूण गुणांची टक्केवारी ८५.१७ एवढी आहे, तर मराठी विषयात ९२ गुण प्राप्त केले. तृतीय क्रमांक लक्ष्मी प्रकाश बावणे हिने पटकावला. तीने मराठी विषयात ९१ गुण प्राप्त केले, तर तीच्या एकुण गुणांची टक्केवारी ७७% आहे. उपरोक्त दोन्ही विद्यार्थिनी ह्या विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय सावली येथील असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय विषय शिक्षक प्रा.आर. व्ही. केदार यांना दिले. सरांच्या योग्य मार्गदर्शनाने आणि विषय सोपा व मनोरंजक करून शिकवण्याच्या पद्धतीने हे यश प्राप्त करू शकलो, असल्याची प्रतिक्रिया दोघींनीही दिली. याशिवाय त्यांनी आपल्या यशात आई-वडील आणि आजोबा यांचेही योगदान असल्याचेही सांगितले. विशेष म्हणजे कु. प्रवीणा आडेपवार ही विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती; परंतु तिला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असल्यामुळे तिने कला शाखा निवडली आणि सावली तालुक्यातून प्रथम आली.
जिल्ह्यातून मराठीत विषयात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीत असलेले सल्लागार डॉ. विजय हेलवटे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार व जिल्हाध्यक्ष प्रा. नामदेव मोरे, जिल्हा मार्गदर्शक प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्राचार्य धर्मराज काळे, सचिव प्रा. देविदास सालवटकर, कार्याध्यक्ष प्रा. गजानन सातपुते व जिल्हा कार्यकारिणीतील समस्त पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.






