शिक्षक क्षमता वृद्धी २.० प्रशिक्षण लोणावळा येथे सुरू …
चंद्रपूर
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत आयोजित शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा, पुणे येथे सुरू आहे. या अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर होणाऱ्या शैक्षणिक परिवर्तनातील संकल्पना शिक्षकांना माहित होण्यासाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० राबविण्यात आले आहे. राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन २० ते २४ जानेवारी पर्यंत सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुसगाव लोणावळा येथे करण्यात आले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारे आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १४ शिक्षकांची निवड करण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरण २०२० व यातील बदल त्या अनुषंगाने शिक्षकांची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी हे प्रशिक्षण राज्यस्तरावर आयोजित केले. यात राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शिक्षक या प्रशिक्षणाला हजर झाले आहेत.
हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी जिल्हा स्तरावर होणार आहे. हे तज्ञ प्रशिक्षक आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षित करणार आहेत. चंद्रपूर येथील शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे तसेच विवेक ईत्तडवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, डॉ धर्मा गावंडे , नामदेव मोरे, अनिल पेटकर, विकास मोहिते, ज्योती तावडे, दीक्षा कांबळे, सुसरीता काळे, अश्विनी भगत, अविनाश जुमडे, ज्योती गावंडे, माधव हाके, नेहा सूर्यवंशी, डिंपल सावरकर, यांची निवड केली.
हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तज्ञ मार्गदर्शकांना ते प्रशिक्षण देणार आहेत. यांची निवड झाल्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






