भद्रावती, दि.२३ : शहरातील सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, लोकप्रिय व्यक्ती नंदू पढाल यांचा तिरूपती येथे नुकत्याच झालेल्या भोई समाज राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र भोईराज रत्न समाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तिरूपती येथे दि.१८ व १९ जानेवारी ला अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था यांच्या माध्यमातून भारतातील संपूर्ण भोई समाजाचे प्रथम राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. अधिवेशनाला उद्घाटक म्हणून राजस्थान राज्याचे राज्यपाल हरी बागडे उपस्थीत होते. या अधिवेशनात भोई समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, रोजगार संबंधातील व राजकीय विषयांवर मंथन करून दिशा ठरवण्यात आली. या राष्ट्रीय अधिवेशनात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या समाज बांधव आणि भगिनींना पुरस्कार देण्यात आले.

या कार्यक्रमात नंदू उर्फ नरेंद्र पढाल नगरसेवक तथा शिवसेना तालुकाप्रमुख भद्रावती यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याची तसेच त्यांची भोई समाजाबद्दल असलेल्या प्रेम, निष्ठा व कार्याची दखल घेत आचार्य गोविंद ब्रह्मगिरी महाराज यांच्या उपस्थितीत आणि संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ काटकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रेमजी मेहरा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुपडू खेडेकर, राष्ट्रीय महासचिव गजानन साटोटे, निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, संयोजक नानासाहेब लकारे, विदर्भ महिला अध्यक्ष सौ. अल्का पचारे यांच्या हस्ते हा महाराष्ट्र भोईराज रत्न समाज पुरस्कार देऊन नंदू पढाल यांना गौरवण्यात आले. या राष्ट्रीय अधिवेशनात देशातील विविध राज्यातून समाजाचे प्रतिनिधी, संस्थेचे पदाधिकारी व असंख्य समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.
भद्रावती शहरातील भोई समाजबांधवांसाठी ही गर्वाची बाब असून सर्व भोई समाजबांधवांकडून नंदू पढाल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






