गदगाव येथील घटना
चिमूर:
चिमूर तालुक्यातील गदगाव येथे गावातीलच बौद्ध बांधवाकडून गावातील मोक्याच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून झेंडा व बुद्धमूर्तीची स्थापना करून जागेला कुंपण करण्यात आले होते. मात्र या शासकीय जागेवर केलेल्या अतिक्रमणास गावातील इतर समाज बांधवांकडून कडाडून विरोध करण्यात आला. गावात केलेले अतिक्रमण व अतिक्रमण विरोधी परिस्थितीमुळे गावांमध्ये अतिशय तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
निर्माण झालेली परिस्थिती चिघळू नये म्हणून याबाबत २८ नोव्हेंबर २०२४ रोज गुरुवारला पोलीस प्रशासन तथा दंगा नियंत्रण पथकास पाचरण करण्यात येऊन गावात शांतता राखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते.
शांततेच्या मार्गातून हा तिढा सोडवण्याचा बराच प्रयत्न केला गेला, परंतु कोणीही मानण्याच्या तयारीत नव्हते . त्यामुळे अखेर प्रशासनाने आज दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी पाच वाजेपासून चिमूर तहसीलचे तहसीलदार राजमाने साहेब यांचे आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष बाकल सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी तालीकोटे पोलीस उपनिरीक्षक वाघ व इतर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात बौद्ध बांधवाकडून केलेले अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी नितीन फुलझेले उपस्थित होते. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी तालीकोटे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ ताफ्यासहित गावातच तळ ठोकून आहेत.






