समाजापुढे ठेवला आदर्श…
भद्रावती,दि.२९(तालुका प्रतिनिधी)
भद्रावती येथील गवराळा वार्डातील रहिवासी आणि रेल्वे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र मुकुंदा सावनकर यांचे मरणोत्तर नेत्रदान नुकतेच करण्यात आले. या कार्यातून त्यांनी समाजाला एक आदर्श दिला.
रामचंद्र सावनकर यांचे दि.२६ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ७२ व्या निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी आणि नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर गवराळा मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक व आप्तेष्ट उपस्थित होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गुंडावार यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. तसेच लोकमान्य विद्यालय परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. येथील लोकमान्य विद्यालयातील कर्मचारी तथा माजी नगरसेवक मधुकर सावनकर यांचे ते वडील होत.
भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गुंडावार यांच्या पुढाकाराने स्व.रामचंद्र सावनकर यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. चंद्रपूरच्या शासकीय नेत्र चिकित्सालयातील डॉ. इंदुरकर आणि डॉ.मेश्राम यांच्या मदतीने नेत्रदानाची प्रक्रिया पार पडली. त्यांचे नेत्र सेवाग्राम वर्धा येथील नेत्रपेढीला दान करण्यात आले. मरणोत्तर नेत्रदान करून तयांच्या कुटुंबीयांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला.






