गडचिरोलीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन २८ नोव्हेंबर शिक्षकदिन म्हणून संपन्न
गडचिरोली
गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेने फुले दाम्पत्य प्रतिष्ठान, देवापूर एरिया, आदर्शनगर गडचिरोली येथे आयोजित केलेल्या, क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन २८नोव्हेंबर शिक्षकदिन कार्यक्रमात उद्घाटक प्रा. संजय लेनगुरे भंडारा यांनी समाजाचा प्रत्येक घटक हा सामाजिक शिक्षक असतो असे मार्गदर्शन केले.
गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेने दरवर्षीप्रमाणे, संघटनेचे अध्यक्ष देवराव मोहुर्ले यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या शिक्षकदिन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.संजय लेनगुरे तुमसर यांनी केले. याप्रसंगी प्रबोधन मंचावर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर कुरखेडा, सामाजिक कार्यकर्त्या व प्रमुख मार्गदर्शिका मा. कविता गेडाम (मडावी) राजुरा व संघटनेचे सल्लागार फुलचंद गुरनूले विराजमान होते.
” शिक्षकांनी नियोजित अभ्यासक्रमाच्या मर्यादित न राहता सामाजिक भान जपत बदलत्या संदर्भात समाजशिक्षकाच्या भूमिकेत अध्यापन करावे. समाजामध्ये वास्तव्य करणारे सर्व समाजशील प्राणी हे आपापल्या परीने शिक्षकच आहेत… त्यामुळे प्रत्येकाने मनावर घेतले तर निश्चितच सामाजिक क्रांती घडून येईल” असे उद्घघाटनीय मनोगत प्रा. संजय लेनगुरे यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले यांच्या विविधांगी कार्याचा आढावा घेताना, ” लोक भावनेचा आदर करून महात्म्यांच्या स्मृतिदिनी शासकीय स्तरावर शिक्षकदिन साजरा करण्यासाठी लोकोत्सवाद्वारे दबाव निर्माण करावा “असे उद्गार प्रमुख मार्गदर्शक मा. प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले. तर, सावित्रीमाईंच्या विचार व कार्याच्या अनुषंगाने त्यांचे समाजाप्रती विशेषतः महिलांप्रती करुणा व त्याग विषद करताना, “सावित्रीमाईंना अपेक्षित बदल महिलांनी स्वत:मध्ये करावा. परिवर्तन शक्य आहे आणि ते सर्वस्वी महिलांच्या हातात आहे. त्यासाठी महिलांनी तयार व्हावे. ” असे आवाहन प्रमुख मार्गदर्शिका मा. कविता गेडाम/मडावी सामाजिक कार्यकर्त्या राजुरा यांनी केले.
याच कार्यक्रम प्रसंगी मा. केशव गुरनूले सृष्टी फाउंडेशन गडचिरोली यांच्या आगळ्यावेगळ्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना समाजशिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री विजय गुरनूले सिंदेवाही यांनी गायलेल्या, महात्मा फुले यांच्यावरील स्फूर्तीदायी गिताने वातावरण भारावून टाकले. काएर्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव श्री राजेंद्र आदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री पुरुषोत्तम लेनगुरे यांनी केले, व संघटनेचे कोषाध्यक्ष श्री नरेंद्र निकोडे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी संपूर्ण जिल्हाभरातील व शेजारच्या चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील विविध जातीधर्माचे समाजबांधव प्रचंड संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .






