विटा, प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे, बळवंत कॉलेज, विटा येथे ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त’ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. चंद्रकांत बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर विभागात विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि संकटाच्या काळात मदत घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. दिलीप जाधव यांनी जीवनातील ताणतणाव, भावनिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेच्या काळात विश्वासू व्यक्तीशी संवाद साधणे, एकमेकांना आधार देणे आणि गरज भासल्यास योग्य व्यक्ती किंवा व्यावसायिकांची मदत घेणे यांचे महत्त्व सांगीतले. कोणत्याही व्यक्तीच्या अडचणींकडे संवेदनशीलतेने पाहणे आणि त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
प्राचार्य प्रो. डॉ. बोबडे म्हणाले, कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, परस्पर सहकार्य आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा असून कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याबरोबरच ‘मदत मागणे ही कमजोरी नसून धैर्याची बाब आहे’ असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. झुंजारराव कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रामचंद्र मुजमुले यांनी तर आभार प्रा. अजित साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. नामदेव गुडघे, प्रा. संतोष कदम, प्रा. सुवर्णा मोहिते, प्रा. मानसी चव्हाण, प्रा. रुपाली बाबर, प्रा. निलोफर मुलाणी, श्री.अभिजीत कुलकर्णी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






