भद्रावती,
यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय, भंगाराम वॉर्ड, भद्रावती येथे गोपालकाला व दहीहंडी उत्सव विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पापिया बिस्वास यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीच्या सदस्या श्रीमती नीलिमा ताई शिंदे तसेच शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. रजनी अनमोलवार मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच अभ्यासेतर उपक्रमांतील प्रगतीचे कौतुक करण्यासाठी पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमाच्या उद्घाटिका श्रीमती नीलिमाताई निळकंठराव शिंदे विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती यांनी मुलांना कथेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. तसेच काही प्रश्न विचारले, त्यांच्या काही समस्या जाणून घेतल्या आणि पालकांना आपल्या पाल्याला वेळ दिला पाहिजे तसेच अमुल्य असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी गोपालकाला उत्सवाचा आनंद घेतला. उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे सहकार्य आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे संपूर्ण कार्यक्रम आनंदमय वातावरणात पार पडला.






