भद्रावती
राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रत्येक भारतवासीयांच्या अंतःकरणात अखंडपणे तेवत राहावी तसेच वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या क्रांतीदर्शी विचारांचा जागर होऊन राष्ट्रभक्ती, सामाजिक एकता, बंधुता आणि मानवसेवेच्या विचारांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथून ९ ऑगस्ट पासून निघालेल्या क्रांतीज्योत यात्रेचे विदर्भातील असंख्य गावामध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करीत दिनांक ३० ऑगस्ट रोजी भद्रावती शहरामध्ये आगमन झाले.
श्रीगुरुदेव सेवा मंडळ, भद्रावतीचे वतीने या क्रांतीज्योत यात्रेचे भव्य व उत्साहात स्वागत करण्यात येऊन स्थानिक श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर, कुणबी सोसायटी, किल्ला वॉर्ड येथे राष्ट्रसंत पादुका दर्शन , पूजन व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम च्या केंद्रीय प्रचार विभागाच्या वतीने आयोजित श्रीगुरुदेव क्रांतीज्योत यात्रेचे भद्रावती शहरांमध्ये आगमन होताच जमलेल्या शेकडो गुरुदेव भक्तांनी भारत माता की जय, श्री गुरुदेव की जय, वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय अशा घोषणा देत अगदी उत्साहाने, उत्स्फूर्तपणे व देश प्रेमाने ओथंबलेल्या भावनेने क्रांतीज्योत यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर यात्रेसोबत असलेल्या पादुका पालखीचे श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीराचे विद्यार्थीनींनी विधिवत पूजन व स्वागत केले. त्यानंतर असंख्य शेकडो गुरुदेव भक्तांसहित स्थानिक रामधून मार्गाने पालखीची मिरवणूक नियोजित स्थळी येऊन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम येथून आलेल्या मार्गदर्शक मंडळींनी तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी क्रांतीज्योती यात्रेचा उद्देश, त्याचे आयोजन यावर प्रकाश टाकत उपस्थित उपासकांना सुंदर असे मार्गदर्शन केले. त्यानंतर आरती व पादुका पूजन कार्यक्रम होऊन प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजनार्थ भद्रावती येथील सर्व गुरुदेव भक्तांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वीतेकरीता आपले अमुल्य योगदान दिले. भद्रावती येथे क्रांतीज्योत यात्रेच्या आगमनामुळे परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण होऊन उपस्थितांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत सदैव तेवत ठेवण्याचा संकल्प केला.






