नागपूर
कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षकांच्या संचमान्यातेचे प्रचलित निकष बदलण्यात येऊन नवीन निकषानुसार संचमान्यता करण्यात आली असल्याने राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यता ही प्रचलित नियमानुसारच व्हावी, ती नवीन निकषानुसार होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघातर्फे पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयावर शुक्रवारी ४ सप्टेंबरला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातील संस्था संचालक मंडळ यांनी पाठिंबा दिला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ वर्षाची संच मान्यता देताना गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू असलेले प्रचलित नियम बदलून नवीन निकष लागू करण्याचे धोरण शासनाने अवलंबलेले आहे. पन्नास वर्षापासून सुरू असलेल्या कार्यपद्धतीला एकाकी पद्धतीने छेद देण्यात आला असल्याने राज्यातील दहा हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. यामुळे अनेक अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यांचा फटका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना पडणार आहे. या आधी सुद्धा या विरोधात अनेक आंदोलने करण्यात आली पण प्रशासनाने या बाबींना गांभीर्याने घेतले नाही, म्हणून हे आंदोलन करावे लागत आहे.
अनेक वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद असल्याने बऱ्याच महाविद्यालयात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यातच शिक्षकांना अशैक्षणिक कामात मोठ्या प्रमाणात गुंतवलेले आहे. एक नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालयात नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. अशाच आता संच मान्यतेचे नवीन निकष लागू करून प्रचलित नियमांना छेद देत अनेक शिक्षकांना अतिरिक्त करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. या विरोधात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये मोठे असंतोष पसरलेले आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ व विदर्भ जुनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी या नवीन निकषाच्या विरोधात व शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या महामोर्चात मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.






