‘महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा” या उपक्रमाचे मार्गदर्शक प्रा. यशवंत पवार
यवतमाळ
महाराष्ट्र राज्य शासनाचे परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा” या अभियाना अंतर्गत आज दि १४ ऑगस्ट २०२६ ला स्थानिक उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ येथे ऑटो रिक्षा चालकांसाठी विनामूल्य मराठी भाषा शिकवणी वर्ग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख, तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. यशवंत पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्रातील अमराठी ऑटो रिक्षा चालक बांधवांना मराठीचे व्यवहार ज्ञान, संवाद कौशल्य यावे यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यवतमाळ यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की, परिवहन क्षेत्रात काम करतांना प्रवाशांशी उत्तम संवाद असणे आवश्यक आहे. अ-मराठी भाषिक वाहन चालकांना दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेची अडचण भासू नये, यासाठी या विशेष मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक मराठी विषय शिक्षक महासंघ यवतमाळचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. यशवंत पवार यांनी उपस्थितांना अत्यंत सोप्या व सुलभ पद्धतीने मराठी भाषेतून संवाद साधण्याचे कौशल्य शिकविले. प्रवाशांशी नम्रपणे आणि स्पष्ट मराठीत कसे बोलावे, याचे प्रात्यक्षिक त्यांनी या वेळी दिले. यातून ऑटो रिक्षा चालक बांधवांना मराठी भाषेत संवाद कौशल्य आल्याने त्यांचा व्यवसाय भरभराटीला येईल असा विश्वास व्यक्त केला. या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र १८ ऑगस्ट २०२६ नंतर आरटीओ कार्यालयामार्फत तपासले जाणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. संदीप खवले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन मोवानी सागर ठोसरे यांनी मानले. कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन विभाग यवतमाळचे सामोवनी गोपाल राठोड, श्री. पिंगे यांच्यासह कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग, ऑटो रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी आणि शहरातील बहुसंख्य ऑटो रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






