सिरोंचा
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी’ संवाद भाषा अभियानांतर्गत अमराठी भाषिक वाहनचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे करण्यात आले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ही मोफत कार्यशाळा भगवंतराव कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, सिरोंचा, जि. गडचिरोली येथे उत्साहात पार पडली. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील सिरोंचा शहरातील अमराठी भाषिक रिक्षाचालकांना दैनंदिन व्यवहारात प्रवाशांशी सहजपणे मराठीत संवाद साधता यावा, तसेच मराठी भाषेचा वापर वाढावा, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत रिक्षाचालकांना दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या मराठी शब्दांचा व वाक्यांचा परिचय करून देण्यात आला. तसेच प्रवाशांशी संवाद साधताना आवश्यक असलेल्या मराठी भाषेचा प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. प्रशिक्षक प्रा. स्वाती येन्नमवार यांनी उपस्थित रिक्षाचालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी श्री. देवेंद्र पाटील उपस्थित होते. तसेच नगरसेवक सतीश राचर्लावार, ऑटोचालक संघटनेचे अध्यक्ष श्री सत्यनारायण एडलावार, उपाध्यक्ष श्री सम्मय्या तोकला, प्रा. तिरुमलेश सर आणि प्रा. बिस्वास मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक श्री. रणजित गागापुरवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नुसरत बाबर शेख यांनी केले.
मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर व्हावा आणि अमराठी भाषिक नागरिकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला रिक्षाचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने रिक्षाचालक बांधव उपस्थित होते.






