संत श्री जगनाडे महाराज जयंती महोत्सव भद्रावती येथे उत्साहात संपन्न…
संताजी महाराजांच्या भव्य शोभायात्रेने भद्रावती नगरी दुमदुमली
भद्रावती :-
भद्रावती येथील संताजी स्नेही मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी “सामाजिक ऐक्य हीच समाजाची खरी शक्ती ताकद आहे” असे मनोगत व्यक्त केले.
संताजी स्नेही मंडळ भद्रावती तर्फे आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक २५ रोज रविवारला सकाळी १०.०० वाजता घटस्थापना व मूर्ती पूजन मान्यवरांच्या हस्ते होऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दुपारी १२.०० वाजता महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम व महिला मेळावा आयोजित केला. या महिला मेळाव्याच्या अध्यक्षा महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार प्राप्त, कवयित्री, सौ. केशनी हटवार तर प्रमुख अतिथी नगरसेविका सौ गिरडकर, सौ. ज्योती गायकवाड, सौ. कांता बेले, सौ. श्रद्धा गिरडकर, सौ. रिता बावनकुळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. महिला मेळाव्याला संबोधित करताना सौ केशनी हटवार यांनी “महिला संघटन व सशक्तिकरण करत असताना, कौटुंबिक जबाबदारी सांभाळणे इतकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले”. महिला मेळाव्याचे सूत्रसंचालन सौ. रेणुका गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन आनिता अष्टणकर यांनी केले.
सायंकाळी ४.०० वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. संताजी महाराज शोभा यात्रेचे उद्घाटन नागमंदिर भद्रावती परिसरात सौ. ज्योती गायकवाड व सौ. केशनी हटवार यांनी संताजी जगनाडे महाराजांच्या पालखी चे पुजन करून केले. नागमंदिर परिसर भद्रावती येथून निघालेली संत संताजी जगनाडे महाराजांची भव्य शोभायात्रा बँड पथक, बैलगाडी, भजन मंडळ, पालखी, रथ, महिला, पुरुष, बाल गोपाल मंडळी, नागरिकांच्या भव्य उपस्थित शिस्तबद्ध पद्धतीने संताजी नगर येथील संताजी मठापर्यंत काढण्यात आली. यात भद्रावती शहरातील समस्त संताजी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संताजी नगर भद्रावती येथील संताजी मठात सायंकाळी ६.३० वाजता पारिवारिक मेळावा व गुणवंत विद्यार्थी व क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर मोते प्रमुख अतिथी मा. दिगंबर उरकुडे अप्पर महाप्रबंधक आयुध निर्माणी चांदा, मा. प्रशांत सूरकर उपमहा प्रबंधक आयुध निर्माणी चांदा, सौ. ज्योती गायकवाड, संरक्षण अधिकारी पं.स.वरोरा, रेडिओ आर्टिस्ट सौ. केशनी हटवार नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार प्राप्त, कवयित्री, भद्रावती, प्रा. डॉ. प्रवीण कुमार नासरे, नगरसेवक अनिल पडोळे, नगरसेविका सौ. गिरडकर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक अनिल पडोळे व सौ. गिरडकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थी व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त खेळाडू व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शोभायात्रेत सहभागी भजनी मंडळ सदस्यांचा देखील सन्मान करण्यात आला. समाजात कुठेही बालविवाह होऊ नये, तो कायद्याने गुन्हा आहे. म्हणून बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा चे वाचन या कार्यक्रमात करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संताजी स्नेही मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम नैताम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेघा शेंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव सुरेश मस्के यांनी केले.
मुख्य कार्यक्रमानंतर रात्री ७.३० वाजता बालगोपालांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. समाजातील अनेक बाल कलाकारांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या नृत्य, कलाविष्कार सादर केल्या. प्रेक्षक रसकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संताजी स्नेही मंडळ भद्रावतीचे समस्त पुरुष पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला भद्रावती शहरातील व भद्रावती तालुक्यातील सर्व संताजी समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.






