यशवंतराव शिंदे प्राथमिक शाळा भद्रावतीचे आयोजन
भद्रावती:
भद्रावती शहरात नुकत्याच पार पडलेल्या ‘कला-संस्कृतीचा संगम’ वार्षिक स्नेहसंमेलन या वार्षिक महोत्सवाने प्रेक्षकांची मने जिंकली. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचलित यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक शाळा चिचोर्डी, यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक शाळा सुर्यमंदिर वॉर्ड, यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक शाळा भंगाराम वॉर्ड या तिन्ही प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम दिनांक २०/०१/२०२६ रोज मंगळवारला स्व.निळकंठराव शिंदे इंडोअर स्टेडियम येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सहसचिव प्रा. डॉ. विशाल निळकंठराव शिंदे तसेच उद्घाटक श्री शालिक दानव सर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा.डॉ. विशाल शिंदे साहेबांनी आपल्या भाषणात कला आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेला पारंपरिक लोकनृत्याचा अविष्कार प्रेक्षकांना खूप आवडला. नारायणी रंदये ह्या विद्यार्थिनीने सादर केलेले तबला वादन विशेष लक्षवेधी ठरले.
विविध संस्कृतींमधील गाण्यांच्या मैफिलीने वातावरणात रंग भरला. पर्यावरण जनजागृतीवर आधारित एका नाटकाने समाजाला महत्त्वपूर्ण संदेश दिला. अनेक चिमुकल्या बालकांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा आविष्कार सादर केला.
कार्यक्रमाच्या शेवटी, उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवर अतिथींच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक धीरज ताजणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोढे सर यांनी केले. मुख्याध्यापक श्री प्रवीण शिंदे सर यांनी उपस्थित मान्यवर सर्व सहभागी कलाकार, स्वयंसेवक आणि उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तिन्ही प्राथमिक शाळेतील कर्मचारी वृंदांनी फार मेहनत घेतली. एकंदरीत हा सांस्कृतिक महोत्सव कला, संस्कृती आणि सामुदायिक भावनेचे प्रतीक ठरला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






