भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे संस्थापक सचिव तथा माजी आमदार स्व. निळकंठराव यशवंतराव शिंदे यांना भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचलित सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने नीलकंठ राव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 14 जानेवारी 26 रोजी त्यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पाचव्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. कार्तिक शिंदे सचिव, प्रा. डॉ. विशाल शिंदे सहसचिव, माजी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे विश्वस्त, प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, प्राचार्य डॉ. सुधीर मोते हे उपस्थित होते.
स्व नीलकंठराव शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाडून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांनी “स्व. नीलकंठ शिंदे यांच्या शैक्षणिक सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्तृत्वाला उजागर केले. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श, वसा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती पुढे रेटत असल्याचे” मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विश्वस्त डॉ जयंत वानखेडे यांनी आपल्या भावना व्यक्त करीत असताना “स्व. नीलकंठराव शिंदे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. परिसरातील शिक्षणाची होत असलेली गैरसोय लक्षात घेता त्यांनी शिक्षणाची मूर्तमेढ आदिवासी भागात असलेल्या चोरा ठिकाणी रोवली. आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे, हे साहेबांच्या कर्तुत्वाचे द्योतक आहे”, असे मनोगत व्यक्त केले.
स्व. निळकंठराव यशवंतराव शिंदे यांच्या पाचव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाला भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती अंतर्गत समस्त प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






