भद्रावतीत ओबीसी बांधवांची बैठक संपन्न
भद्रावती
सकल ओबीसी भव्य महामोर्चा दिनांक १० ऑक्टोबर २०२५ सकाळी अकरा वाजता नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या महामोर्चासाठी जनजागृती करणे व नियोजन करण्यासाठी ओबीसी समन्वयक प्रा. अनिल डहाके, एडवोकेट विलास माथनकर, अनिलभाऊ धानोरकर, माजी नगराध्यक्ष, पुरुषोत्तम नैताम, सुनील नामोजवार आदींच्या उपस्थितीत ओबीसी समाजाची बैठक भद्रावती येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी संपन्न झाली.
महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 काढलेल्या जीआरच्या विरोधात संपूर्ण ओबीसी समाज आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. मराठ्यांना कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी व ईतर मागण्याला धरून ओबीसी समाजाने 10 ऑक्टोबर 2025 ला नागपूर येथे भव्य महामोर्चा आयोजन केलेले आहे.
या महामोर्चात ओबीसी समाजातील समस्त अठरापगड जातींनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे व स्वतःच्या आरक्षणावर घातले जाणारे अतिक्रमण थांबावावे व ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी अशा अनेक मागण्यांना धरून हा मोर्चा काढला जाणार आहे. यात सर्वच विभागातील ओबीसी समाजाने मोठ्या संख्येत उपस्थित राहण्यासाठी समाज जागृती व नियोजनाची बैठक भद्रावती येथे हुतात्मा स्मारक सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.
महाराष्ट्र शासनाने उठले सुटले कोणालाही ओबीसीतून आरक्षण देण्याचे जे सत्र उपसले आहे, हे खऱ्या अर्थाने ओबीसींवर अन्यायकारक आहे. मराठ्यांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण दिले जाते, ही ओबीसींना मिळणारे आरक्षण संपवण्याचा घाट आहे. हे ओबीसी समाज कदापिक खपून घेणार नाही. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, ओबीसी ची जात निहाय जनगणना करावी व इतर मागण्यांसाठी या महामोर्चाच्या आयोजन करण्यात आलेले आहे. तेव्हा समाजातील सर्वच ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने या महामोर्चात उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी महामोर्चा समन्वयक यांनी केली आहे. सभेला ओबीसी समाजातील सर्वच जातीतील प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






