चंद्रपूर
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत तथा झाडीपट्टी रंगभूमी वरील रंगकर्मी डॉ. श्याम मोहरकर लिखित , मधुश्री प्रकाशन पुणे येथून प्रकाशित 'लालगुंजी' कादंबरीचा प्रकाशन सोहळा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मान. हंसराज अहिर यांचे शुभ हस्ते , श्री. प्रदीप दाते, वि. सा. संघ नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी भाष्यकार श्रीमती विजया मारोतकर, ज्येष्ठ साहित्यिक नागपूर आणि डॉ. जनबंधू मेश्राम यांनी कादंबरीचे कथासूत्र, मर्म , आशय, व्यक्तीरेखा, झाडीबोलीतील भाषाशैली रसिक वाचकांसमोर उलगडून दाखवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्याम मोहरकर यांनी केले. कादंबरीला सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक दा. गो. काळे शेगाव यांची कादंबरीचे अंतरंग उलगडणारी समर्पक प्रस्तावना दिली असून, पाठराखण सुप्रसिद्ध कादंबरीकार डॉ. रविंद्र शोभणे यांनी केली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. परमानंद बावनकुळे यांनी केले, तर रसिकांचे आभार प्रदीप देशमुख यांनी मानले.
प्रकाशन सोहळ्याला चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील साहित्यिक, वाचक बहूसंख्येने उपस्थित होते. वि. सा. संघ, फिनिक्स साहित्य मंच, सूर्यांश साहित्य, सॄजन साहित्य , झाडीबोली साहित्य मंडळ या चंद्रपूरातील अग्रगण्य साहित्य संस्थांनी प्रकाशन सोहळ्याचे देखणे आयोजन केले.






