यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील आयोजन
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपुर येथे दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त मराठी साहित्याचे अवांतर वाचन करावे. मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगावा असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्राचार्य डॉक सुधीर मोते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक उज्वला वानखेडे डॉ प्रशांत पाठक व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी महाराष्ट्राचे थोर साहित्यिक तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांचा साहित्याचा परिचय करून दिला. त्याचबरोबर मराठी भाषेचे महत्त्व अतिशय साहित्यिक वाणीतून व्यक्त केले. विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्वही याप्रसंगी सांगितले. यावेळी प्राध्यापक सौ उज्वला वानखेडे व डॉक्टर प्रशांत पाठक यांनी मराठी भाषेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कु. नेहा नालमवार व कु. श्रावणी खंडारकर या विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. किशोर ढोक यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, शिक्षक- शिक्षिका वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






