नागपूर
नविन वर्षाच्या सुरुवातीला नागपूर येथे होणाऱ्या मराठी भाषा प्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका व शिक्षण विभाग नागपूर व मराठी अभ्यास केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १२ ते १४ जानेवारी २०२५ दरम्यान राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.
नविन वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या या साहित्य संमेलनाला केंद्रीय मंत्री मा. नामदार श्री. नितीन गडकरी यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संमेलनाच्या आयोजकांनी नियोजनासंबंधी बैठक शनिवारी नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडली. यावेळी. मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश हटवार, नागपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश नखाते व ईतर पदाधिकारी उपस्थित होते. यात विविध समित्यांचे गठण करून कार्यवाही व जबाबदारी निश्चित करण्यात आली.
संमेलनाच्या निमित्ताने विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी, सहसचिव अतुल गाडगे, ललित तपासे, संयोजक डॉ. वंदना बडवाईक, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ नागपूर चे सचिव सपन नेहरोत्रा, डॉ. अश्विनी देशमुख, डॉ. मानसी कोलते, सुधास पारधी, प्रशांत मेश्राम यांनी नुकतीच मा. श्री. नितीन गडकरी यांच्या नागपूर निवासस्थानी सोमवारी भेट घेतली. मा. नामदार श्री नितीन गडकरी यांनी या मराठी भाषा प्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद स्वीकारावे, अशी विनंती यावेळी आयोजन समितीतर्फे करण्यात आली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे ही मराठी भाषकांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असून, अशा भाषिक साहित्य संमेलनांमुळे मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून याला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मा. नामदार श्री नितीन गडकरी यांनी आयोजन समितीच्या सदस्यांना दिले. मराठी भाषा प्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाच्या आयोजनात मा.नितीन गडकरी यांनी दाखविलेल्या सहकार्यासाठी त्यांचे रमेश बक्षी यांनी आभार मानले.






