भद्रावती : स्वागत सेलिब्रेशन हॉल, भद्रावती येथे १४ डिसेंबर २०२४ रोजी युरो लिटल्स स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, गाणी आणि नाटिकांद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले. युरो लिटल्स ग्रुपने यंदा आपल्या ५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा उत्सव साजरा केला, ज्याला ‘५ वर्षांचा उत्कृष्टतेचा प्रवास’ म्हणून संबोधण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये माननीय मनस धनोरकर आणि पार्थ धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय अभी हेमके, किशोर हेमके, पांडुरंग हेमके, चंद्रशेखर नायर, प्रमोद नागोसे, कुमुद हेमके आणि कोमल नागोसे यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच खास बनला.

युरो लिटल्सचे संस्थापक आणि अध्यक्ष अक्षय हेमके यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी बाल शिक्षणाचे महत्त्व आणि लहान वयात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय अभ्यासक्रमासोबतच उपक्रमशैलीची कशी गरज आहे, हे सांगितले. त्यांनी पालकांच्या पाठिंब्याबद्दल आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी अभी हेमके यांनी आभार प्रदर्शन केले आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेमध्ये पालक आणि शिक्षकांचा मोठा वाटा आहे. युरो लिटल्स ग्रुपचे ५ वर्षांचा प्रवास हा शिक्षण, संस्कार आणि बालकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत कार्यरत राहण्याचा उत्तम उदाहरण आहे. युरो लिटल्स समूह भविष्यातदेखील अशाच प्रकारे गुणवत्तेचे शिक्षण देत अधिक प्रगती करेल, असा विश्वास अक्षय हेमके यांनी व्यक्त केला.






