गोंदिया
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य या शासनमान्य नोंदणीकृत संघटनेची नवीन कार्यकारणी ची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. नुकतीच महाराष्ट्रातील मराठी विषय शिक्षक महासंघाची आभासी पध्दतीने सभा घेण्यात आली. त्यात मराठी विभागप्रमुख प्रा. पवन कटरे यांची गोंदिया जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष प्रा सुनील डिसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आभासी बैठकीत सचिव प्रा बाळासाहेब माने यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली.
या महासंघाच्या वतीने मराठी भाषा विषयातील शिक्षकांच्या समस्या, अध्ययन अध्यापन करताना येणाऱ्या अडचणी या संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जाऊन, मराठी भाषा विषय हा महाराष्ट्रात इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्याशाखेत सक्तीचा व्हावा. मराठीला कुठल्याही विषयाचा पर्याय असता कामा नये, ही महासंघाची भूमिका आहे. यासाठी शासन स्तरावर, प्रशासकीय स्तरावर संघटनेच्या माध्यमातून अनेक पत्र व्यवहार झाले.
संघटनेच्या घटनेप्रमाणे दर तीन वर्षांनी राज्य कार्यकारणीची निवड करून कार्यकारिणी घोषित करण्यात येते. सन २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची नवीन राज्य कार्यकारणी बाळासाहेब माने यांनी घोषित केली.
प्रा पवन कटरे हे संजय गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तेढा येथे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून मागील २५ वर्षापासून कार्यरत आहेत. मागील पाच वर्षाच्या कार्यकारणीत ते गोंदिया जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते. या कालावधीत त्यांनी मराठी विषय शिक्षकांना संघटित करून विषय शिक्षकांच्या समस्या, अध्ययन अध्यापनातील येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. ते विदर्भ जुनीयर कॉलेज टीचर असोसिएशन गोंदियाचे अध्यक्ष आहेत, तसेच लायन्स क्लब गोंदियाचे अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक संस्था व साहित्यिक चळवळीत ते सहभागी असतात .
अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली. त्यांचे निवडीबद्दल मराठी विषय शिक्षक महासंघ चे उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश हटवार चंद्रपूर, कोषाध्यक्ष संजय लेनगुरे भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील प्राध्यापक, व साहित्यिक मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन केले. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






