भद्रावती
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन भद्रावती येथे करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथील ४ विद्यार्थी तालुका स्तरावर विजय संपादन करून भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरावर करणार आहेत .
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या असून नीलकंठराव शिंदे वरिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या इंडोअर स्टेडियम येथे तालुकास्तरीय
बुद्धिबळ क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील विविध वयोगटातील विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .
या स्पर्धेत यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथील
वयोगट १७ मुलांमध्ये अयान निसार शेख यांनी विजय संपादन केला व जिल्हास्तरावर मजल मारली आहे. तर १९ वर्ष वयोगटात शर्विल ज्ञानेश हटवार याने तालुका स्तरावर विजय संपादन केले. जिल्हास्तरावर तो भद्रावतीचे प्रतिनिधित्व करणार आहे . तर मुलींच्या १९ वर्ष वयोगटात
कु. साहेबा शेख व कल्याणी बावणे यांनी तालुका स्तरावर विजय संपादन केला. हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या स्पर्धेत परीक्षक म्हणून भिष्माचार्य बोरकुटे यांनी काम पाहिले. तर ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा कमलाकर हवाईकर, डॉ ज्ञानेश हटवार व तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केले.
बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे , प्राचार्य डॉ जयंत वानखेडे , क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण व सर्व प्राध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.






