गोंडवाना विद्यापीठाच्या टीम चे प्रतिनिधीत्व…
भद्रावती
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे आदिवासी बहुल गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्हाचा विकास साधण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाद्वारे सन २०११ मध्ये स्थापित राज्य विद्यापीठ आहे. हे दोन जिल्हे वन व खनिज संपदेने विपुल आहेत . या संपदेचा वापर करुन या जिल्हयातील लोकांच्या जिवनात समृध्दी आणण्याचा प्रयत्न गोंडवाना विद्यापीठ करीत आहे, व त्यादृष्टीने नव- नविन कोर्सेस सुरु करण्याकरिता विद्यापीठ प्रयत्नशिल आहे.
त्याचाच एक भाग म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ची चार सदस्सीय टिम विद्यापीठाचे कुलगुरु माननिय डॉ . प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली करटीन विद्यापीठ पर्थ वेस्टर्न आस्ट्रेलीयाच्या विज्ञान व अभियांत्रिकी विभागास भेट देण्यास दिनांक ०६/०७/२०२४ ला गेले आहेत. या टिममध्ये अधिसभा सदस्य, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य व भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक नि. शिंदे तसेच श्री. स्वप्नील दोन्तुलवार, अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य व श्री. प्रशांत मोहीते व्यवस्थापन परिषद सदस्य यांचा अंर्तभाव आहे.
या अभ्यास दौ-या दरम्यान गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व करटीन विद्यापीठ ऑस्ट्रेलीया यांच्यात सामंजस्य करार व दोन विद्यापीठामध्ये सहयोग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत. तसेच करटीन विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देवून, त्यातील काही उपक्रम आपल्या विद्यापीठात सुरु करता येतील काय ? यावर सुद्धा विचार केला जाणार आहे.
करटीन विद्यापीठ पर्थ वेस्टर्न आस्ट्रेलीया या जागतिक ख्यातीच्या विद्यापीठाशी आपल्या विद्यापीठाचा सहयोग निर्माण करणा-या टिम मध्ये शैक्षणिक व सामाजिक कार्याचा अनुभव असलेले व समाजाच्या उत्थानासाठी अविरत प्रयत्नशिल व पेशाने शल्य चिकीत्सक असलेले डॉ विवेक नि शिंदे यांची वर्णी लागणे ही गोंडवाना विद्यापीठाशी संबधीत सर्वासाठी आनंदाची बाब आहे. निश्चितच त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा करटीन विद्यापीठ भेटी दरम्यान गोंडवाना विद्यापीठाला होणार आहे. डॉ. विवेक नि शिंदे यांच्या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.






