spot_img
spot_img
20.3 C
New York
Friday, July 31, 2026

आता शांती नाही तर क्रांती होईल : निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्त

…पुन्हा एकदा निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्तांनी सिमा रेखा आखणीचे काम पाडले बंद

२८ वर्षापूर्वी निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवर दोन नवीन प्रकल्प उभारण्यात येणार

जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाच्या जागेवर खाजगी कंपन्यांचे कोणतेही काम होवू देणार नाही : प्रकल्पग्रस्त आक्रमक

भद्रावती :

दिनांक २ जुन ला निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाच्या जागेवर खाजगी कंपन्यांचे सिमा रेखा आखणीचे काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले होते व जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाच्या जागेवर खाजगी कंपन्यांचे कोणतेही काम होवू देणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र खाजगी कंपनीने प्रकल्पग्रस्तांसोबत सामोपचाराने बैठक घेवून वाटाघाटी करण्यापेक्षा मुजोरी करून पोलीस बंदोबस्तात दोन दिवसा अगोदर पुन्हा सिमा रेखा आखणीचे काम सुरू केले, शेवटी संतापून जावून प्रकल्पग्रस्तांनी आज (दि.१५) ला सकाळी १० च्या सुमारास काम सुरू असलेल्या जागेवर जावून जेसीबी व इतर यंत्र सामुग्री बंद पाडली आणि कंपनीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास हाकलून लावले. त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनला जावून एम.आय.डी.सी. व खाजगी कंपनी विरोधात तक्रार देवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी जवळपास चारशे प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

तालुक्यात सुमारे २८ वर्षापूर्वी ११८३ हेक्टर २३ आर इतकी जमीन प्रस्तावित निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. परंतु या ठिकाणी आजपावेतो कुठलाही प्रकल्प कार्यान्वीत झाला नाही. प्राप्त झालेल्या माहिती नुसार या जमिनीवर दोन प्रकल्प उभारण्यात येणार असून सदर जमिनीची सिमा रेखा आखणीच्या कामाला दि. २८ मे पासून सुरूवात झाली होती. मात्र सदर सिमा रेखा आखणीचे काम निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्तांनी (दि. २ जुन) ला बंद पाडले होते. त्यानंतर परत एकदा कंपनीने सीमा रेखा आखणीला सुरुवात केली असता, प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेवून कंपनीचे काम करणाऱ्यांना हाकलून लावले.

आज झालेल्या या आंदोलनात मौजा विजासन, रुयाड (रिठ), पिपरी (देश.), टोला, चारगांव, लोणार (रिठ) तेलवासा, कुनाडा, चिरादेवी व ढोरवासा या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी होते.

प्रकल्पाकरिता २८ वर्षाअगोदर ११८३ हेक्टर २३ आर. इतकी जमीन प्रस्तावित निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पासाठी बारा ते चौदा हजार प्रतीएकर प्रमाणे कवडीमोल भावाने संपादित करण्यात आली होती. परंतु या ठिकाणी आजपावेतो कुठलाही प्रकल्प कार्यान्वीत झाला नाही. यामुळे संबंधीत शेतकरी परीवारातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीपासून वंचित राहावे लागले. याचा प्रतिकूल परीणाम म्हणून बेरोजगारीमुळे संबंधित परीवाराची एक पिढी बरबाद झाली. दरम्यान त्या शेतीजमिनीवर अनेक प्रकल्पग्रस्त वर्षानुवर्षे शेती करीत होते. आणि आता अचानक प्रकल्पग्रस्तांसोबत वाटाघाटी न करता नविन खाजगी कंपनी येवून सीमा रेखा आखणीचे काम सुरू करीत आहे. त्यामुळे चिडून जावून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी लाठ्या काठ्या घेवून काम बंद पाडले व निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्प, एम.आय.डी.सी., येवू घातलेले दोन खाजगी प्रकल्प याविरोधात एफ.आय.आर. दिली.यावेळी प्रकल्पग्रस्त वासुदेव ठाकरे, मधूकर सावनकर, सुधीर सातपुते, संदीप खुटेमाटे, प्रविण सातपुते, चेतन गुंडावार, बबन डोये, रविंद्र बोढेकर,अनुप खुटेमाटे ,लिमेश माणूसमारे ,जगन दानव बंडू भादेकर व इतर प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

काय आहेत मागण्या :

प्रति सातबारा एक नोकरी किंवा नोकरीचे पॅकेज पंचवीस लाख रूपये देण्यात यावे, समजा एखादा शेतकरी नोकरी करण्यास इच्छुक नसेल तर त्याला नोकरीचे पॅकेज पंचवीस लाख रूपये देण्यात यावे, जमिनीच्या आजच्या बाजार भावा प्रमाणे सर्व शेतकऱ्यांना रक्कम देण्यात यावी, समजा ज्या शेतकऱ्याच्या मुलांचे वय कमी असल्यास त्याला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी दिल्यानंतर त्याचा योग्य पगार ठरविण्यात यावा, शेतकऱ्याच्या कुटूंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्याची हमी घ्यावी, नोकरी केव्हा देणार आहे, याची हमी द्यावी, प्रत्येक शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याच्या मुलांना त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्यात यावी, शेती गेलेल्या शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना नोकरीकरिता प्रथम प्राधान्य देण्यात यावे, या प्रकल्पाअंतर्गत कोणकोणते गाव दत्तक घेण्यात येणार आहे. याची सर्व माहिती देण्यात यावी. गावात शुध्द पाणी, विज, मार्ग याची व्यवस्था करण्यात यावी, कंपनीने वीस फुट जागा सोडून कंपाउंड वॉलचे बांधकाम करावे, शेतकऱ्यांचे रस्ते बंद होत असल्यामुळे कंपाउंड वॉलच्या आसपास वीस फुट सोडलेल्या जागेतून शेतकऱ्यांना येणे-जाणे करता येईल, अशी व्यवस्था करावी. कंपनी तर्फे दत्तक घेतलेल्या गावामध्ये ‘शेतकरी भवन’ बांधून देण्यात यावे, आमच्या शेती कंपनीत गेल्याला अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाले असल्यामुळे त्या जमिनीवर आमचा ताबा आहे. आम्ही शेतकरी उत्पन्न घेत आहोत. यामुळे आमच्या मागण्या मान्य नसतील तर आमच्या सर्वांच्या जमिनी आम्हाला परत देण्यात याव्या. अशा मागण्या प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या आहेत.

प्रकल्पग्रस्ताचा इशारा :

आतापर्यंत निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्तांनी शांतीने एम.आय.डी.सी. व खाजगी कंपनीला समजावून सांगितले की आधी आमचे म्हणणे ऐकून घ्या, पण प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता जर कंपनी मुजोरीने काम करीत असेल तर शांती न होता क्रांती होईल, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे, अन्यथा परिसरात शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास प्रशासन स्वतः जवाबदार असेल : वासुदेव ठाकरे, निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्पग्रस्त शेतकरी

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!