🪷 बारावी उत्तरपत्रिका तपासणीचे काम रखडणार
🪷 राज्यातील १५ लाख तर नागपूर बोर्डाच्या दीड लाखापेक्षा अधिक उत्तर पत्रिकांचे तपासणीचे काम थांबले
वर्षभर केलेली आंदोलने शासनाने केली बेदखल शिक्षकांचा आरोप….
“बहिष्कार” शासनाने लादलेले आंदोलन
शिक्षणातील महत्त्वाच्या मागण्या संदर्भात गत वर्षापासुन महासंघ व विज्युक्टा लोकशाही मार्गाने अनेक आंदोलन केली. नागपुरला विधिमंडळावर आंदोलनानंतर प्रश्न सोडवण्याचे मा. शिक्षणमंत्र्यांनी मान्य केले होते तेही पाळले नाही.
९ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी व १२ फेब्रुवारीला शिक्षण उपसंचालक यांचे मार्फत राज्यभर आंदोलन करुन निवेदन मंत्र्यांना देण्यात आली तरीसुध्दा कोणत्याही प्रकारची चर्चा व बैठक घेण्याची तसदी घेण्यात आली नाही. शिक्षकांनी वर्षभर केलेली आंदोलने शासनाने बेदखल केली आहेत. त्यामुळे नाईलाजाने बोर्ड परीक्षेच्या मुल्याकनावर बहिष्कार घ्यायला शासनाने भाग पाडल्याचे विज्युक्टा महासचिव डाॅ. अशोक गव्हाणकर यांनी म्हटले आहे. त्याच्या नेतृत्वात मुख्य नियामक प्रा. पारखी सर, प्रा. डॉ अभिजित पोटले, प्रा. भाऊ गोरे, प्रा. अशोक डोफे, प्रा. धर्मेश मुनघाटे, प्रा. डॉ गजानन धांडे प्रा. डॉ गोविंदा चौधरी, प्रा. किशोर बहुरूपी, प्रा. मोझरकर, प्रा. प्रशांत डेकाटे यांचे उपस्थितीत आज नागपूर विभागीय शिक्षण मंडळावर इंग्रजी विषयाच्या नियामक सभेवर बहिष्कार आंदोलन घेवून बोर्ड अध्यक्ष सौ. माधुरी सावरकर सचिव, चिंतामणजी वंजारी यांना निवेदन सादर करण्यात आले. पुण्याला सुद्धा मुख्य नियमकांच्या इंग्रजी, हिंदी, मराठी या विषयाच्या सभा झाल्या नाही त्यामुळे राज्यातील २० लाखापेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासणीचे काम रखडणार आहे नागपूर बोर्डाच्या दीड लाखापेक्षा अधिक उत्तर पत्रिकांचे मूल्यांकनाचे काम थांबले आहे याचा परिणाम बारावी परीक्षा निकालावर होण्याची शक्यता आहे
आंदोलनाच्या मागण्या
१) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अर्धवेळ,विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करावी.
२) १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना सुध्दा जुनी पेन्शन योजना लागू करावी.
३) शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०,२०,३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी
४) अंशतः अनुदानावरील शाळा व कमवि 100%अनुदान द्यावे.
५) विनाअनुदानित कडून अनुदानित मध्ये बदली स्थगिती उठवावी.
६) पायाभुत पदांना मान्यता व आय टी विषयाला अनुदान द्या
७) शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरीत भरावीत व विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक द्यावेत .
८) कमवि तुकडी मान्यतेसाठी शाळा संलग्न २१ विद्यार्थी व महाविद्यालय संलग्न ३१ विद्यार्थी ग्राह्य धरावेत. संच मान्यतेत आधार वैद्यतेची अट काढून टाकावी
9) उपदानाची रक्कम २०लाख करावी निवृत्तीचे 60 वर्ष करावे.
घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढवावे , उपप्राचार्य यांना वेतन वाढ द्यावी, शुन्य कार्यभारा शिवाय शिक्षकाला अतिरिक्त करू नये. शिक्षकाला अशैक्षणिक कामे देऊन विद्यार्थ्यांना शिकण्यापासुन वंचित ठेवु नये या व इतर मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले. इंग्रजी विषयाचे नियामक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






