महाराष्ट्र : मुंबई पोलिस दलात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या गृह खात्याने घेतला असून मुंबई पोलिस दलात तीन हजार पोलिसांची कंत्राटी भरती करण्यात येणार आहे. राज्य सुरक्षा महामंडळातर्फे जास्तीत जास्त 11 महिन्यांच्या कंत्राटावर ही पोलिस भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत कमी असून नवी भरती होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती करण्याचा निर्णय गृह विभाकडून घेण्यात आला आहे. यासाठी गृहखात्याकडून 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गृह खात्याच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून राज्य सरकारवर जोरदार टीकेचे झोड उठले आहेत.

सण-उत्सवांच्या काळात मुंबई पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण पडतो. मनुष्यबळ कमी असल्या कारणाने मुंबईत सुरक्षा व्यवस्था पुरवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. याच अनुषंगाने, राज्याच्या गृह खात्याने एक मोठा निर्णय घेत पुढील पोलिस भरती होईपर्यंत मुंबईत कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती करण्याचे निश्चित केले आहे.
या कंत्राटी पोलिस भरतीत जास्तीत जास्त 11 महिन्याच्या कंत्राटा वर भरती केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारद्वारे 100 कोटी 21 लाख रुपयांची तरतूद तर या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी साठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही भरती राज्य सुरक्षा महामंडळांच्या जवानांतून केली जाणार आहे. हे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर सुरक्षा महामंडळाचे जवान पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेवेत रूजू होतील.
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. राज्यातील तरुणांसाठी हा निर्णय अन्यायकारक असून तो मागे घ्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कंत्राटी पोलिस भरतीबाबत राज्य सरकारवर टीका करत आपल्या ट्विटर पोस्ट वर लिहिले , “एकीकडे पोलिस भरतीचा पेपर फुटतो, दुसरीकडे मुंबईत तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याची जाहिरात निघते. प्रामाणिकपणे मेहनत करून पोलिस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांचा विश्वासघात महायुती सरकार करत आहे. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षा कंत्राटदार पोलिसांकडे देणे कितपत योग्य आहे?”
“कंत्राटी भरती करण्यासाठी जे कारण सरकारने दिले आहे त्यात कुठला ही तर्क नाही. उत्सव काळात अतिरिक्त मनुष्यबळ लागेल हे सरकारला आता कळले का? पेपरफुटीची दखल घ्यायची नाही, शासकीय भरती टाळायची आणि कंत्राटी भरती करायची.”
“राज्य सरकारने कंत्राटी पोलिस भरतीचा निर्णय मागे घेऊन पोलीस भरतीचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा आणि भरतीसाठी प्रामाणिकपणे घाम गाळणाऱ्या युवक युवतींना पोलिस दलात संधी उपलब्ध करून द्यावी,” असे ते म्हणाले.






