भद्रावती : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पौष्टिक तृणधान्य जनजागृती पंधरवड्याचे येथील तालुका कृषी कार्यालयातर्फे आयोजन करण्यात आले असून येथील लोकमान्य विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्याबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन सरपटवार होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, मंडळ कृषी अधिकारी अरविंद भरडे, कृषी पर्यवेक्षक ताजने, कृषी सहाय्यक गणेश कावरखे, उपमुख्याध्यापक रुपचंद धारणे, ज्येष्ठ शिक्षक रमेश गजबी मंचावर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना कृषी विभागाचे अधिकारी जाधव, भरडे, ताजने यांनी पौष्टिक तृणधान्यामध्ये असलेले जीवनसत्त्व आणि त्यांचा आरोग्यास होणारा फायदा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थ्यामध्ये तृणधान्य (मिलेट) जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकाची लागवड करून सध्याच्या जीवनशैलीत विद्यार्थांच्या आहारातील पौष्टिक पदार्थांचा आहार वाढविणे हा हेतू आहे. तृणधान्य पदार्थांचा वापर कमी होत असल्याने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. उत्पन्नात वाढ करणे व लोकांमध्ये पौष्टिक गुणधर्माची जागरूकता निर्माण करून दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक ताजने यांनी केले. तर संचालन व आभारप्रदर्शन उपमुख्याध्यापक रुपचंद धारणे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल गावंडे, राजकुमार हातझाडे, प्रतीक नारळे, लीला खुजे, प्राजक्ता चिखलीकर यांनी मोलाचे सहकार्य केले.






